प्रतिनिधी / पणजी
पोलीस खात्यातर्फे राजधानीत काल गुरुवारपासून सागर कवज सुरु झाले आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर बॅरीगेट घालून वाहनांची तपासणी केली जाते. अचानक होणाऱया वाहन तपासणीच्या कार्यक्रमामुळे राजधानीत वाहतूकीला अडथळा निर्माण होत असतो मात्र नियमानुसार सागरकवज करणे बंधनकारक आहे असे पोलिस अधिकाऱयांनी सांगितले. सुरक्षा व्यवस्थेची तालीम म्हणून ठरावीक काही महिन्यांनी पोलीस खात्यातर्फे सागर कवज कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. असेही त्यांनी सांगितले.
पोलीस खात्याच्या विविध विभागाना जागृत ठेवण्यासाठी तसेच यंत्रणांची नियमितपणे चाचणी व्हावी या उद्देशाने सागर कवज कार्यक्रम आयोजित केला जातो. कालपासून तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. काही महत्वाच्या ठिकाणी बनावट बॉम ठेवले जाणार असून ठरलेल्या वेळात पोलिसांनी त्याचा शोध घ्यायचा असतो. पोलीस खात्यातील एटीएस विभाग तसेच पोलीस स्थानकातील पोलीस बनावट बॉम शोधून काढण्याचे काम करीत असतात. एक प्रकारे पोलीस सुरक्षा यंत्रणेची ही तालीम असते असेही पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.









