चिपळूण :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे येथील नदीत शनिवारी टँकरद्वारे रसायन मिश्रित पाणी सोडले गेल्याच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करताना गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील ‘साफयिस्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला सोमवारी रात्री नोटीस बजावत उत्पादन तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मंडळाच्या या कारवाईने औद्योगिक क्षेत्रासह कामगार तसेच परिसरातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल येण्यापूर्वीच मंडळाने थेट कारवाई करताना यापूर्वीही वारंवार नियमभंग करत पर्यावरणास गंभीर इजा केल्याचे कारण स्पष्ट केले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कामथे-हरेकरवाडी येथे शनिवारी रात्री एका धाब्याजवळील नाल्याजवळ 5 टँकर एका ओळीत उभे होते. काही तऊण रात्री खेकडे पकडण्यासाठी नदीकाठी गेले असता त्यांना 3 इंचाच्या पाईपद्वारे टँकरमधून रसायन मिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थांच्या मदतीने 2 टँकर अडवले. तर 3 टँकर घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी भरलेले टँकर आणि त्यावरचे चालकही पळून गेले. पोलीस प्रशासनाने हे दोन्ही टँकर ताब्यात घेऊन पंचनामा केला. त्यानंतर या बाबतचा तपास करतानाच हे टँकर गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीतून आले असल्याचे पुढे आले.
- युवासेना, मनसे आक्रमक
या प्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख उमेश खताते यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक होत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस ठाण्यात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर 3 दिवसात पाणी नमुन्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करतो, असे उत्तर उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिले होते. तर टँकर मालकावर गुन्हा दाखल करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. पाठोपाठ मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाब विचारला होता. निर्माण झालेल्या जनक्षोभानंतर मंडळाकडून धडक कारवाई करण्यात आली.
- कंपनीवर विविध ठपके
नदीत पाणी सोडणे, मंडळाच्या परवानगीशिवाय अधिक पाण्याचा वापर, बॉयलरचे इंधन नमुना न बदलता वापरणे, बॉयलरमध्ये खराब झालेली बॅग फिल्टर आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यरत नसणे, यापूर्वी सातारा उपप्रादेशिक कार्यालयाकडूनही प्रदूषणाचे नमुने दूषित आढळणे, शिवाय दिलेल्या सूचनेप्रमाणे कोणत्याही सूचना पाळल्या गेलेल्या नसल्याची कारणे देत सोमवारी रात्री कोल्हापूर प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यानी कंपनीला थेट उत्पादन बंदची नोटीस बजावली.
- वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश
प्रादेशिक अधिकाऱ्यांनी कंपनीला उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावतानाच महावितरण तसेच एमआयडीसीलाही पत्र दिले आहे. यामध्ये साफयिस्ट कंपनीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेशही मंडळाकडून देण्यात आले आहेत.
- बड्या कंपनीवरील कारवाईनंतर खळबळ
गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीत ज्या काही कंपन्या शिल्लक आहेत, त्यामध्ये साफयिस्ट ही बडी कंपनी आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग आहे. विशेष म्हणजे दसपटीसह परिसरातीलच स्थानिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उत्पादन बंदच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणी कंपनी पुढे कोणता खुलासा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता आमच्याकडून नंतर बाजू मांडली जाईल, असे सांगण्यात आले.








