वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचे सोमवारी मोठ्या भक्तिभावाने व आनंदोत्सवामध्ये उद्घाटन करण्यात आले. यमनापूर येथेही श्रीराम मंदिराचे उद्घाटन आनंदोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळी 7 वा. मारुती गल्लीतील मारुती मंदिरामध्ये अभिषेक व काकड आरती सादर करण्यात आली. यानंतर 8 वा. सुवासिनींच्या कलश मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मारुती गल्ली, होळी गल्ली, गणपत गल्लीतून कलश मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावामध्ये भगव्या पताका, घरोघरी भगवे झेंडे व दारामध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यामुळे संपूर्ण गाव भगवेमय व राममय झाल्याचा भास होत होता. दुपारी 1 नंतर महाप्रसादास प्रारंभ करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोमवारी संध्याकाळी 7 वा. मारुती मंदिर येथे दीपोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सदस्या व रामभक्त उपस्थित होते.









