वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत शनिवारी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान भारताने लेबेनॉनचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तत्पुर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कुवेतने बांगलादेशवर 1-0 अशी मात करत अंतिम फेरी गाठली आहे. भारत आणि कुवेत यांच्यात अंतिम सामना 4 जुलै रोजी खेळवला जाणार आहे.
या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंत 13 वेळा तर सलग 9 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंत ही स्पर्धा 8 वेळा जिंकली आहे. 2003 साली झालेल्या स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता.
भारत आणि लेबेनॉन यांच्यातील हा उपांत्य फेरीचा सामना अटीतटीचा झाला. निर्धारित 90 मिनिटांच्या कालावधीत तसेच त्यानंतर दिलेल्या 30 मिनिटांच्या जादा कालावधीत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. 120 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांना आपले खाते उघडता आले नाही. पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतातर्फे कर्णधार सुनील छेत्री, अन्वर अली, महेश सिंग आणि उदांता सिंग यांनी गोल केले. लेबेनॉनतर्फे पेनल्टी शुटआऊटमध्ये वालीद शोर आणि मोहमद सादेक यांनी दोन गोल केले. तर भारतीय गोलरक्षक गुरुप्रित संधूने पेनल्टी शुटआऊटमध्ये लेबेनॉनच्या हसन मेटॉक, खलील बादेर यांचे फटके अडविले. भारतीय फुटबॉल संघाचा लेबेनॉनवरील हा सलग दुसरा विजय आहे. अलीकडेच ओदिशामध्ये झालेल्या इंटरक्वॉन्टिनंटल चषक फुटबॉल स्पर्धेत भारताने लेबेनॉनचा 2-0 असा पराभव करत अजिंक्यपद मिळवले होते.









