वृत्तसंस्था / रांची
2025 ची सॅफ वरिष्ठांच्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे यजमानपद रांची भूषविणार आहे. सदर स्पर्धा 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान येथील बिरसा मुंडा अॅथलेटिक स्टेडियममध्ये होणार असल्याची माहिती झारखंडचे क्रीडा मंत्री सुदिव्य कुमार यांनी दिली आहे.
शुक्रवारी येथे आयोजित केलेल्या एका समारंभात क्रीडामंत्री सुदिव्य कुमार यांच्या हस्ते चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठांच्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे तसेच स्पर्धा गीताचे अनावरण करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून झारखंडमध्ये महत्त्वाच्या विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. सॅफ अॅथलेटिक स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे नामकरण दलमा असे करण्यात आले आहे. झारखंड राज्याचा प्रमुख प्राणी म्हणून हत्ती ओळखला जातो. 24 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता रांचीच्या बिरसा मुंडा अॅथलेटिक्स स्टेडियमध्ये या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आयोजित केले आहे. या उद्घाटन समारंभामध्ये झारखंडचे सुमारे 5000 युवक सहभागी होत आहेत. दक्षिण आशिया संघटनेचे सदस्य असलेल्या सहा देशांचे सुमारे 300 अॅथलिट्स या स्पर्धेत भाग घेत आहेत. यजमान भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदिव आणि लंका या देशांच्या खेळाडूंमध्ये वर्चस्वासाठी झटापट राहील. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकार घेतले जातील. यजमान भारताचे 93, बांगलादेशचे 24, भूतानचे 8, नेपाळचे 30, मालदिवचे 19 आणि श्रीलंकेचे 83 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताला या स्पर्धेचे तिसऱ्यांदा यजमानपदाची संधी मिळाली आहे. भारताने 1997 साली पहिल्यांदा तर 2008 साली दुसऱ्यांदा ही स्पर्धा भरविली होती.









