अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने अखेर माघार घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची जोखीम पत्करण्यापेक्षा ती बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन महाशक्तीने एकप्रकारे सेफ गेम खेळल्याचेच पहायला मिळते. तर प्रतिस्पर्ध्याने लढण्याआधीच शस्त्रे खाली ठेवल्याने फुटीच्या ग्रहणामुळे गलितगात्र झालेल्या सेनेकरिता हा मोठा दिलासा ठरावा. शिवसेनेतील आमदारांच्या ऐतिहासिक बंडानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाशक्तीचे सरकार अस्तित्वात आले. या बंडानंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक अर्थात लिटमस टेस्ट म्हणून अंधेरी पोटनिवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. सेनेकडून ऋतुजा लटके यांची उमेदवारी आधीच जाहीर करण्यात आली होती. किंबहुना, लटके यांना शिंदे गटाकडे ओढण्याचे विफल झालेले प्रयत्न, महापालिकेतील लिपिकपदाचा राजीनामा नामंजूर करीत त्यांची करण्यात आलेली कोंडी व न्यायालयाच्या निर्णयानंतर राजीनाम्यास मान्यता देण्याची ओढवलेली नामुष्की या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुरली पटेल यांना मैदानात उतरविण्यात आले खरे. तथापि, एकूणच मतदारसंघातील समीकरणे लक्षात घेता लटकेंसमोर मुरजी कितपत टिकतील, याबाबत साशंकताच होती. 2019 च्या निवडणुकीत युती असतानाही बंडखोरी करणाऱया याच मुरजी पटेल यांना रमेश लटके यांनी 16 ते 17 हजार मतांनी अस्मान दाखविले होते. या खेपेला शिंदे गट व भाजपा एकत्र असले, तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात शिंदे यांची म्हणून काही ताकद नाही, हे भाजपही ओळखून होता. दुसऱया बाजूला काँग्रेसची येथे जवळपास 30 हजारांच्या आसपास मते आहेत. लाखभर मराठी भाषक मतदारांसह मुस्लिम, ख्रिश्चन व दक्षिण भारतीयांची लक्षणीय संख्या या बाबी सेनेकरिता अनुकूल होत्या. येथील गुजराती टक्क्याचा मुरजी यांना हातभार लागणे शक्य असले, तरी निवडून येण्याकरिता तितकासा तो पुरेसा नव्हता. त्यात शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती, ठाकरे यांनी हिंदुत्वाची नव्याने केलेली सर्वसमावेशक व्याख्या, त्यातून अवघ्या काही दिवसांतच मशाल चिन्हाचा झालेला प्रचार यामुळे ही निवडणूक सत्ताधाऱयांना तशी सोपी नव्हतीच. त्यामुळे केवळ राज यांच्या पत्रामुळेच निवडणूक बिनविरोध झाली, असे म्हणणे अतिशयोक्त ठरू शकते. भाजपाने ही निवडणूक न लढता बिनविरोध करावी व दिवंगत लोकप्रतिनिधीस श्रद्धांजली अर्पण करावी, असे पत्र राज यांनी फडणवीस यांना पाठविणे, प्रताप सरनाईक यांनी अशाच भावनिक पत्राचा आधार घेणे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून देणे आणि त्यानंतर थेट भाजपाने माघार घेतल्याचे जाहीर करणे, हे दिसते तितके साधे, सरळ आहे का, हाच मुळात प्रश्न होय. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. मुंबई मनपा ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मानली जाते. त्यामुळे सर्वपक्षीयांचाच मुंबई पालिकेवर डोळा आहे, हे वेगळे सांगायला नको. पालिका जिंकायची, तर थंड डोक्याने काम करावे लागेल, हे भाजपासारखा पक्ष जाणून असेल. मागच्या दोन ते तीन महिन्यांतील नाटय़मय राजकारणामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. सेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवसेना असे दोन पक्ष आकारास आले आहेत. शिंदे गटाने मोठय़ा प्रमाणात फोडाफोडीचा अवलंब केला असला, तरी त्यांना मुंबई पट्टय़ात फार यश आलेले दिसत नाही. उलटपक्षी उद्धव ठाकरे यांना वेगवेगळय़ा समाजघटकांमधून प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे अंधेरी निवडणूक लढवून मशाल चेतविण्यापेक्षा सध्या दोन पावले मागे घेणेच शहाणपणाचे ठरेल, असाच विचार सत्ताधाऱयांनी केला असावा. तो सकृतदर्शनी योग्यच म्हणायला हवा. आता महाराष्ट्राने आपली संवेदनशीलता, संस्कृती दाखवून दिली वगैरे, अशी मांडणी केली जात आहे. परंतु, पंढरपूर, कोल्हापूर येथेदेखील ही संधी उपलब्ध असताना ती का दवडली गेली, हे अनाकलनीय होय. अगदी राजीनामा प्रकरणावरून ऋतुजा लटके यांना मनस्ताप देणे टाळले असते, तरी ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभून दिसले असते. मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचे 2011 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी हर्षदा यांनी राष्ट्रवादीकडून पोटनिवडणूक लढविणे पसंत केले. या निवडणुकीत भाजपा व मनसे यांनी एकत्र येत हर्षदा यांना पराभूत केले होते, या आठवणीलाही यानिमित्ताने उजाळा देण्यात येत आहे. खरे तर भाजपा हा अत्यंत प्रॅक्टिकल पक्ष आहे. निवडणूक गांभीर्याने लढविणे, उमेदवार जिंकून येण्याकरिता प्रचंड मेहनत घेणे, ही पक्षाची वैशिष्टय़े आहेत. त्यामुळे एरवी एकतर्फी वाटणाऱया पोटनिवडणुकाही भाजपाने जिंकल्याची उदाहरणे सापडतात. असा पक्ष अंधेरीची निवडणूक अशी सहजासहजी सोडेल काय, असा राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जाणारा प्रश्न म्हणूनच अनाठायी मानता येत नाही. अंधेरीची निवडणूक झाली असती आणि त्यात ठाकरेंच्या सेनेला चांगले मताधिक्य मिळाले असते, तर नक्कीच त्यातून वेगळा संदेश गेला असता. शिंदे सरकारविरोधातील असंतोष वाढविण्याचा उपयोगही सेनेसारख्या भावनाशील पक्षाकडून होण्याची शक्यता अधिक होती. त्याऐवजी सेफ गेम खेळत राज, शिंदे व फडणवीस यांनी सेनेकडून ही संधी हिरावून घेतली, असे म्हणता येईल. अर्थात असे असले, तरी ‘सेना संपली’, असा घोष करणाऱयांना सेनेच्या उमेदवारापुढे नांगी टाकावी लागली, हा नाही म्हटले, तरी उद्धव ठाकरे यांचा राजकीय विजय म्हणता येईल. यातून मिळालेला आत्मविश्वास सेनेला मुंबई मनपा निवडणुकीकरिता कामी येऊ शकेल. त्याचबरोबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याकरिताही ठाकरे पितापुत्रांना यातून बळ मिळेल, यात शंका नाही. बाकी काही का असेना. यानिमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संवेदनशीलता, असे शब्द महाराष्ट्रातील जनतेला ऐकायला मिळाले. सर्वपक्षीय सामंजस्याचे असे तोंडदेखले का होईना दर्शन याची देही याची डोळा अनुभवायला मिळणे, हेही नसे थोडके.
Previous Articleविंडीजलाही स्कॉटलंडकडून पराभवाचा धक्का
Next Article 90 वर्षीय व्यक्तीचे स्कायडायव्हिंग
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.