इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेच्या नुकत्याच मिळालेल्या जेतेपदामुळे आनंदित झालेला भारतीय फुटबॉल संघ आजपासून सुरू होत असलेल्या ‘सॅफ स्पर्धे’त वाढीव आत्मविश्वासाने प्रवेश करेल आणि आपले वर्चस्व या स्पर्धेतही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आज बुधवारी श्री कांतिरवा स्टेडियमवर भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानशी होईल. सोमवारी रात्री पाकच्या संघाला भारताचा व्हिसा मिळालेला असल्याने हा सामना वेळापत्रकानुसार खेळवला जाईल.
पाकिस्तान कदाचित भारताला मोठे आव्हान देऊ शकणार नसला, तरी भारतीय संघ त्यांच्या मोहिमेला विजयाने प्रारंभ करण्यास उत्सुक असेल. आठ वेळचा विजेता भारत हा नेपाळ, कुवेत आणि पाकिस्तानसोबत ‘अ’ गटात आहे. लेबनॉन, मालदीव, भूतान आणि बांगलादेश या इतर संघांना ‘ब’ गटात स्थान देण्यात आले आहे. इंटरकॉन्टिनेंटल चषक जिंकण्यात यश आल्याने आपल्या खात्यात आणखी एक चषक जमा करण्याची भारतीय संघाची इच्छा निश्चितच वाढलेली असेल.
भारताने रविवारी कलिंगा स्टेडियमवर लेबनॉनला 2-0 ने पराभूत करून इंटरकॉन्टिनेन्टल स्पर्धा जिंकली. लेबनॉनवर मागील 46 वर्षांत भारताने मिळविलेला हा पहिला विजय होता आणि त्यातील एक गोल कर्णधार सुनील छेत्रीने नोंदविला. यामुळे भारतीय संघाचे मनोबल निश्चितच वाढलेले असेल. ‘सॅफ’ स्पर्धेतही छेत्रीकडून तसाच खेळ होण्याची भारतीय संघाला आशा आहे. छेत्री या स्पर्धेतून मलेशियाच्या मुख्तार दाहारीला मागे टाकण्याचे ध्येय समोर ठेवून खेळू शकतो. दाहारीच्या नावावर 89 गोल असून तो दुसरा सर्वाधिक गोल करणारा आशियाई फुटबॉलपटू आहे. सुनील छेत्रीने 137 सामन्यांतून भारतासाठी 87 गोल केले आहेत आणि ‘सॅफ’ स्पर्धेत आणखी तीन गोल नोंदविल्यास त्याला आणखी एक दुर्मिळ टप्पा गाठता येईल.
भारत या स्पर्धेचा गतविजेता असून त्यांनी 2021 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे भारत बेंगळूरमध्ये त्यांच्या खात्यात स्पर्धेचे नववे विजेतेपद जोडण्यास उत्सुक असेल. भारताने 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021 मध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे. मालदीव (2008, 2018) आणि बांगलादेश (2003) हे संघ भारताकडून चषक हिरावून घेण्यात यशस्वी झाले आहेत. ‘सॅफ’ स्पर्धेतील यशामुळे भारताला ‘फिफा’ क्रमवारीत बढती मिळण्यास मोलाची मदत झाली आहे.
भारतीय संघ : गोलरक्षक : गुरप्रीतसिंग संधू, अमरिंदर सिंग, फुरबा लाचेनपा टेम्पा. बचावपटू : सुभाशिष बोस, प्रीतम कोटल, संदेश झिंगन, अन्वर अली, आकाश मिश्रा, मेहताब सिंग आणि राहुल भेके. मध्यफळीतील खेळाडू : लिस्टन कुलासो, आशिक कुऊनियान, सुरेशसिंग वांगजाम, रोहित कुमार, उदांता सिंग, अनिऊद्ध थापा, नौरेम महेश सिंग, निखील पुजारी, जॅक्सन सिंग, सहल अब्दुल समद, लालेंगमाविया राल्टे, लल्लियानझुआला छांगटे, रोवलिन बोर्जिस, नंधा कुमार. आघाडीपटू : सुनील छेत्री, रहीम अली, इशान पंडिता.
सामन्यांची वेळ : कुवेत विऊद्ध नेपाळ, दुपारी 3.30 वा., भारत विऊद्ध पाकिस्तान संध्याकाळी 7.30 वा.









