इराणने वायू क्षेत्र उघडल्यानंतर भारताची कार्यवाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, तेहरान
इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरीकांना तेथून सुरक्षिपणे बाहेर काढण्याचे अभियान भारताने हाती घेतले आहे. गेले 9 दिवस इस्रायल आणि इराण यांच्यात सशस्त्र संघर्ष होत आहे. त्यामुळे विमानवाहतूक बंद आहे. परिणामी, अनेक भारतीय विद्यार्थी आणि नागरीक इराणमध्ये अडकले आहेत. दोन दिवसांपूर्वी इराणने आपले वायुक्षेत्र उघड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने विमानांच्या साहाय्याने अनेक भारतीयांची तेथून सुखरुप सुटका केली आहे.
भारत भारतीय नागरीकांप्रमाणेच नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरीकांनाही इराणबाहेर काढणार आहे. यासाठी या दोन देशांच्या प्रशासनांनी भारताला विनंती केली आहे. या विनंतीचा स्वीकार करुन भारताने हा निर्णय घेतला आहे. या देशांच्या काही नागरीकांची सुटका आतापर्यंत भारताकडून करण्यात आली आहे.
शनिवारपर्यंत सातशेंची सुटका
शुक्रवारपर्यंत भारताने 557 भारतीय नागरीकांची सुटका केली होती, अशी माहिती विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. शनिवारी या नागरीकांमध्ये 200 आणखी लोकांची भर पडली आहे. शनिवारी इराणहून 3 विमाने भारतीयांना घेऊन परतली आहेत. जवळपास 10 हजार भारतीय नागरीक इराणमध्ये अडकले आहेत, अशी अनधिकृत माहिती आहे. इराणच्या आसपासच्या देशांचे साहाय्यही या कामासाठी घेण्याचा विचार भारत करीत आहे.
दहा वर्षांमध्ये पाच अभियाने
भारताने 2015 पासून अशी पाच अभियाने पार पाडली आहेत. 2015 मध्ये हिंसाचारग्रस्त येमेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यात आले होते. 2021 मध्ये देवीशक्ती अभियानाच्या अतंर्गत हिंसाग्रस्त अफगाणिस्तानातून भारतीयांची सुटका करण्यात आली होती. 2022 मध्ये गंगा अभियानाच्या माध्यमातून युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यात आले होते. 2023 मध्ये इस्रायल-हमास संघर्षात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यात आली होती. तर आता 2025 मध्ये इराणमधून भारतीयांची सुटका करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली.









