राजस्थानच्या अजमेर उत्तर मतदारसंघातील चुरस वाढली
राजस्थानातील विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि काँग्रेस सातत्याने दिग्गज चेहऱ्यांना स्वत:सोबत जोडत आहे. एकीकडे दिग्गजांकडून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत, तर दुसरीकडे मनधरणीचे सत्र सुरू आहे. राज्यात उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेत्यांकडून पक्षांतर करण्यात येत आहे. राजस्थानात आता साध्वी अनादि सरस्वती यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. साध्वी अनादि सरस्वती आता अजमेर उत्तर मतदारसंघात भाजपचे आमदार वासुदेव देवनानी यांच्यासमोर आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत.
अजमेर उत्तर या मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते वासुदेव देवनानी हे दीर्घकाळापासून एकतर्फी विजय मिळवित आले आहेत. याचमुळे भाजपने यावेळी देखील त्यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. अशा स्थितीत काँग्रेसने आता त्यांना टक्कर देण्यासाठी साध्वी अनादि सरस्वती यांची निवड केली आहे.
साध्वी अनादि सरस्वती यांचे मूळ नाव ममता कलानी असून त्या सिंधी समाजाशी संबंधित आहेत. सिंधी समाजाचा अजमेर उत्तर मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. देवनानी यांच्या विरोधात साध्वी असे राजकीय लढतीला स्वरुप मिळाल्यास येथील चुरस चांगलीच वाढणार आहे. साध्वी अनादि सरस्वती या काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य मोहन प्रकाश आणि स्वातंत्र्य सेनानी हेमू कलानी यांच्या परिवाराशी संबंधित आहेत.









