अध्याय एकोणीसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले , भक्तियोगाचे स्वरूप मी तुला यापूर्वीच सांगितले आहे परंतु ते ऐकण्याची तुला अतिशय आवड आहे म्हणून तुला माझी भक्ती प्राप्त होण्याचे श्रे÷ साधन सांगतो. भक्तीचे माहात्म्य केवढे मोठे आहे ते तुला माहीत आहेच. ज्याला माझ्या भक्तीची आवड असते, तो साऱया त्रिभुवनात मला प्रिय होतो कारण माझ्या भजनानेच माझ्या भक्तांना परमपदाची प्राप्ती होते.
भक्तीचे लक्षण पहिल्यापासून देव आपण होऊन सांगत आहेत. भगवंत म्हणाले , माझ्या अमृतमय कथांविषयी श्रद्धा ठेवावी. नेहमी माझ्या गुणांचे आणि नामांचे संकीर्तन करावे, माझी पूजा करण्यात अत्यंत नि÷ा ठेवावी आणि स्तोत्रांच्याद्वारे माझी स्तुती करावी.
अमृतासारख्या ज्या माझ्या कथा आहेत, त्या भक्तिपूर्वक श्रवण केल्या असता, त्यांच्यापुढे प्रत्यक्ष अमृताची गोडीही फिकी पडून तत्काळ भक्तिमार्गाची गोडी लागते. देव हे अमृतपान करतात, पण तेसुद्धा शेवटी मरण पावतात परंतु जे माझे कथामृत सेवन करतात, ते कळिकाळालासुद्धा नागवतात.
कथासारामृत सेवन केले म्हणजे ते अतिशय उन्मत्त होतात आणि त्या धुंदीत मरणालाच मारीत सुटतात. त्यामुळे त्यांच्या धाकानेच सारा संसार पळत सुटतो. माझे कथामृतसार प्राशन केले असता माझ्या भक्तीमध्ये त्यांचे अंतःकरण रंगून जाते. त्यामुळे ते माझे गुण व चरित्र अत्यादराने उल्हासपूर्वक गातात. माझे नाव, माझी पदे, अद्वैतबोधाने नानाप्रकारच्या छंदांनी कीर्तनामध्ये मोठय़ा आनंदाने गातात आणि परमानंदाने डुलत राहतात. मोठय़ा समारंभाच्या वेळी अत्यंत प्रेमाने नामसंकीर्तनाचा गजर करीत असतात व नामघोषाबरोबर टाळय़ांवर टाळय़ा वाजवितात, त्यायोगे महापापांचीही होळी होऊन जाते. अशी कीर्तनाची आवड उत्पन्न झाली, म्हणजे शास्त्राsक्त प्रायश्चित्ते देशोधडीला लागतात, तीर्थे बापुडवाणी होऊन बसतात आणि जपतपांची संकटे नाहीशी होतात. कीर्तनाचा गजर ऐकून यमलोकीचा व्यापार खुंटून जातो. यमदूतांना काही काम न राहिल्यामुळे ते रिकामे हिंडू लागतात. आणि यमधर्म आपल्या पाशांचा भारा लपवून ठेवतो.
कीर्तनाची गोडी पाहून देव लवकर लवकर धावत येतो. वैकुंठाहून तो अत्यंत आनंदाने झपाटय़ाने उडी घालतो. असा कीर्तनाचा नित्यनिरंतर जो गजर करितो, त्याच्या मी श्रीकृष्ण आधीन होतो. कीर्तनाने खरोखरच मला इतकी भूल पडते. कीर्तनाप्रमाणेच माझे पूजन करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे हे लक्षात घेऊन माझे गरुडध्वजाचे पूजनही भक्त मोठय़ा आदराने करतो. सुगंधित पुष्पादिकांच्या सामग्रीने घवघवीत पूजा बांधतो. ह्याप्रमाणे अत्यंत नि÷sने व सावधानतेने माझे पूजन करून माझे स्तुतिस्तोत्रही गात राहातो. अर्धा क्षणही फुकट जाऊ देत नाही. माझ्या सेवेमध्ये आदर ठेवतो. मला साष्टांग नमस्कार करतो. माझ्या भक्तांची पूजा विशेष रीतीने करतो आणि सर्व प्राण्यांमध्ये मला पाहातो. तो आपली ‘इंद्रिये’ पूजाविधानाकडे योजतो. ‘वाणी’ हरिकीर्तनाकडे अर्पण करतो. ‘ह्रदय’ माझ्या ध्यानात मग्न करितो आणि ‘अष्टांग ’ नमस्काराकडे लावतो. अशा प्रकारे अत्यंत आवडीने तो अंतर्बाह्य मलाच विकलेला असतो पण माझे भक्त पाहताक्षणीच त्याला इतका आनंद होतो की, त्या आनंदाच्या भरात तो माझ्याकडे यायलाच विसरतो. माझे भक्त मोठय़ा भाग्यानेच घरी येत असतात. त्या वेळी तोच दिवाळी दसऱयाचा सण म्हणून तो समजतो. मुलगी जशी सासराहून माहेराला यावी, त्याप्रमाणे त्या ठिकाणी सारी तीर्थे धावत येतात. भक्तपूजेची आवडी पाहण्याकरिता सनकादिकांच्यासुद्धा उडय़ा पडतात. नारद, प्रल्हादादिक भक्तांच्या झुंडीच्या झुंडी धावत येतात. त्या ठिकाणी असंख्य सिद्ध गोळा होतात. मोठमोठय़ा देवांचे तर पेवच फुटते. महात्म्याचे थवेच्या थवे दाटतात व पितर धापा टाकीत धावत येतात. वेदांचा तर तेथे रिघावच होत नाही. विधिविधाने लाजून मागेच फिरतात. ह्याप्रमाणे माझ्या भक्ताच्या पूजेच्या कौतुकाने दारापुढे गर्दीच गर्दी उसळते.
क्रमशः







