अध्याय सविसावा
भगवंत उद्धवाला सत्संगतीचे महत्त्व समजावून सांगत आहेत. ते म्हणाले, संसारांतून तरून जाण्याला सत्संगती हाच खरा आधार आहे. संतांचे भक्तिभावाने चरण धरले असता त्यांच्याकडून दीनांचा उद्धार होतो. जसा सूर्य उदय पावून लोकांच्या डोळ्यांना पाहण्याची शक्ती देतो, त्याप्रमाणे संतपुरूष स्वरूपाला आणि भगवंतांना पाहण्याची दृष्टी देतात. संत हे माझेच सगुण रूप असतात. ज्याप्रमाणे सूर्य हा सकल सृष्टीला उजेड देतो आणि रात्रीचा सगळा अंधार आपल्या तेजाने नाहीसा करून टाकतो, त्याप्रमाणे सत्संगरूपी सूर्य उगवला की, तो अविद्येची रात्र निश्चयाने नाहीशी करून टाकतो. अविद्येमुळे माणसाला मी म्हणजे हा देह असे वाटत असते तसेच समोर दिसणारी दुनिया खरी आहे असेही त्याला वाटत असते. सद्गुरूंच्या उपदेशाने त्याचे हे अज्ञान दूर होते. आपल्या शरीरातला आत्मा हीच आपली खरी ओळख आहे हे त्याच्या लक्षात येते. सत्संग प्राप्त झाला की, आपल्या शरीरातील जीव आणि शिव हे एकच आहेत हे लक्षात येते. त्याने सद्गुरूंच्या उपदेशाचे तंतोतंत पालन केले की, दोन्ही एक होतात. सत्संगसूर्याचा प्रकाश होताच साधकाचा मुमुक्षु होतो. आपण करत असलेल्या कर्मातून जे पापपुण्य जमा होते ते भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो हे ज्याच्या लक्षात आलेले असते त्याला मुमुक्षु म्हणतात. असे मुमुक्षु वाट्याला आलेले कर्म निरपेक्षतेने करतात आणि मिळालेले कर्मफल ईश्वराला अर्पण करतात. असे केल्याने त्यांना पापपुण्य भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यामुळे मृत्युनंतर ते निजधामाला पावतात. सूर्योदय झाला म्हणजे लोकांची कामे करायची लगबग सुऊ होते, त्याप्रमाणे सत्संगसूर्याच्या संगतीने मुमुक्षुंची निरपेक्षतेने कर्म करण्यास सुरवात होते. सूर्य उगवला की, वेद जाणणारे, श्र्रद्धाळू लोक त्याला अर्घ्यदान देतात, त्याप्रमाणे सत्संगसूर्याचा संबंध घडताच मुमुक्षु देहबुद्धीला तिलांजली देतात. त्यामुळे मी माझं किंवा इच्छा, वासना, अहंकार या गोष्टी त्यांना शिवतसुद्धा नाहीत. मी कर्ता आहे हा अहंकार माणसाची आध्यात्मिक उन्नती होऊ देत नाही, म्हणून ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे याज्ञिक लोक होमात आहुती देतात, त्याप्रमाणे सत्संगरूप सूर्योदय झाला म्हणजे मुमुक्षु लोक ज्ञानाग्निमध्ये अहंकाराची आहुती देतात. सूर्य आकाशात उगवून शरीराची झोप दूर करतो तर संत चिदाकाशामध्ये उदय पावून जीवांना चित्प्रकाशाने जागृत करतात. याप्रमाणे साधूंची सूर्याशी तुलना करायचा मोह होतो खरा पण ही तुलना एव्हढ्यावरच थांबते कारण सूर्याला अस्त आहे पण साधू हे सदासर्वदा प्रकाशमानच असतात. हा ह्या दोघांच्यातला मोठा फरक असल्याने साधु हे सूर्यासारखे आहेत म्हणावे तर हे म्हणणेही निखालस चुकीचे ठरते. ही तुलना न होण्याची इतरही अनेक कारणे आहेत. सूर्याला ढग झाकू शकतात, पण साधू हे सदासर्वदा निर्मळच असतात. ग्रहणाची वेळ आली असता सूर्याला राहु ग्रासून टाकतो, पण साधु ग्रहांचा ठावठिकाणा नाहीसा करून आत्मानंदातच राहतात. ग्रहाची बाधा शरीरापुरती मर्यादित असते पण साधुना देह प्रारब्धावर टाकून राहण्याची कला अवगत असल्याने ते देही असून विदेहीपणे रहात असतात. दाट धुके पडले असता रविमंडळ झाकून जाते परंतु साधूंना अंधार, धुके किंवा मोहपटल यत्किंचितही बाधत नाही. त्यांच्या सात्विकतेचा प्रकाश कायमच सर्वांना स्वयंउद्धाराचा मार्ग दाखवत असतो. सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना ताप देतो पण साधू निजांगाने जगाला शांत करतात. प्रत्येक दिवसाचा उगवता सूर्य माणसाचे आयुष्य एक एक दिवसाने कमी करतो पण साधू आत्मोपदेशाने सर्वाना अक्षय करून सोडतात. सूर्यप्रकाशामुळे सर्वांना सृष्टी दिसू लागते आणि सत्संगाच्या दृष्टीने चिन्मात्रस्वरूपाने सृष्टीची स्थिती ठसते. ह्याप्रमाणे विचार करून पाहिले असता साधू हे सूर्याहून श्रेष्ठ आहेत.
क्रमश:








