अध्याय अठ्ठाविसावा
सद्गुरुकृपा, ज्ञानखड्ग, निराभिमान, निष्ठा ह्या गोष्टींचा उलगडा भगवंत करत आहेत. ते म्हणाले, माणसाच्या देहावर अहंकाराचे आवरण असते. ते बाजूला केले की, अहंकार नष्ट होऊन पूर्ण ब्रह्माचे दर्शन होते. ते ब्रह्म निर्गुण निराकार असून सर्व देहात एकसारखेच वास करून असते. जे विवेकचतुर असतात ते ह्याप्रमाणे आत्मवस्तूची ओळख करून घेतात. हेच विवेकज्ञान होय. आत्मवस्तू ही निर्गुण निराकार असते परंतु श्रुतींच्या माध्यमातून आपल्याला तिचे इत्थंभूत शब्दज्ञान होते. वेदरूप नारायण मीच आहे आणि वेद हे माझेच मनोगत आहे. ज्यांना हे माहित आहे ते वेदवचन प्रमाण मानून, श्रुतीच्या शब्दज्ञानातून आत्मवस्तू जाणून घेतात. श्रुतींचे श्रवण करून ते पावन होतात. अशा पद्धतीने निजात्म स्वरूप जाणून घेणे सर्वांनाच शक्य होत नाही कारण त्यासाठी देहाशी संबंधित असलेल्या विषयांचा मनापासून त्याग घडावा लागतो. विषयांचा त्याग घडण्यासाठी देहबुद्धी म्हणजे माणसाचे हवे, नकोपण नष्ट व्हावे लागते. असे झाले की, तो आहे त्यात समाधानी राहण्याची कला शिकतो. त्यातील कौशल्य आत्मसात केल्यावर साधक निष्पाप होतो. माणसाला विषय चटकन सोडवत नाहीत कारण त्याला विषयांचा एव्हढा ओढा असतो की, त्यापासून अलग होणे हे कर्मकठीण काम असते. बरं एकदा विषयापासून दूर गेला की झाले अशी परिस्थिती नसल्याने त्याला ही सत्वपरीक्षा नेहमीच द्यावी लागते. म्हणून त्याचा विशेष सराव करावा लागतो. त्याला अभ्यास असे म्हणतात. ह्या अभ्यासात मनात येणाऱ्या संसार विषयक विचारांना रोखून धरावे लागते. निष्ठेने असा प्रयत्न करण्याला तप असे म्हणतात. जो असे तप निष्ठेने करून मनाला निर्विचार करतो त्याच्या पापाचे क्षालन होते. त्यालाच उपनिषदात सांगितलेल्या निर्गुण निराकार आत्मतत्वाचे अनुमान होते. असे आत्मतत्वाचे अनुमान झाले की, देह जड मूढ अचेतन आहे हे लक्षात येते. त्याचबरोबर त्या जड देहामध्ये नारायण चेतनेच्या रुपात उपस्थित असतो हेही समजते. जड असलेल्या देहामध्ये जर नारायणाची उपस्थिती नसेल तर तो असून नसून सारखाच म्हणजे मिथ्या असतो. हे देहाचे मिथ्यत्व ध्यानात घेऊन, निर्जीव देहाशी संबंधित विषयांकडे असलेली ओढ कमी कमी करत पूर्णपणे थांबवावी लागते. त्याचबरोबर सर्व सजीव निर्जीवात उपस्थित असलेल्या एकमेवाद्वितीय नारायणाशी अद्वैत साधण्याचा सराव करावा लागतो. असे करण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. हे सर्व समजून घेऊन आत्मस्वरुपाशी अद्वैत साधीन असे एखाद्याने मनाने ठरवले तरी, स्वत:च्या प्रयत्नाने ते शक्य होत नाही कारण मी म्हणजे हा देह अशी माणसाची ठाम समजूत असते त्या कल्पनेतून बाहेर पडून स्वत:ची खरी ओळख मी आत्मरूप असून, ईश्वरी अंश आहे अशी होण्यासाठी सद्गुरूंच्या कृपाप्रसादाची गरज असते. तो प्राप्त झाल्याशिवाय आपली आत्मोद्धार होण्याच्या दृष्टीने पुढील प्रगती होणार नाही. हे लक्षात घेऊन साधकाने सद्गुरूंना कोणत्याही प्रकारचा अभिमान न बाळगता, त्यांच्याशिवाय आपला कुणीही त्राता नाही ह्या भावनेने शरण जावे. सद्गुरुना जो अनन्य भावनेने शरण जाईल त्याला सद्गुरुकृपेचा प्रसाद मिळतो. शिष्य कोणत्या पातळीवर उभा आहे हे सद्गुरू ओळखून असतात. त्याची पात्रता आणि अधिकार जाणून सद्गुरू त्याला गुह्यज्ञानाचा उपदेश करतात. सर्वत्र व्यापून असलेल्या परब्रम्हाशिवाय इतर सर्व गोष्टी नाशवंत असल्याने मिथ्या आहेत हे श्रुतीचे अतिगुह्य असे उत्तमोत्तम ज्ञान त्याला सदगुरुंकडून प्राप्त होते. हे ज्ञान ज्याचे परम सौभाग्य असते त्यालाच सद्गुरू समजावून सांगतात. असे गुरुवचन कानी पडले की, शिष्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्याने समाधान लाभते. तो स्वानंदाने चिद्घनी रमून जातो. आत्मज्ञान झाल्याने त्याने पुढील साधना कोणती करावी किंवा कोणते कर्माचरण करावे हे त्याला सांगावेच लागत नसल्याने ह्याबाबत वेदसुद्धा मौन बाळगतात. आता तो आणि परब्रह्म हे एकरूप झालेले असल्याने त्याच्या सर्व दु:खाची समाप्ती झालेली असते.
क्रमश:








