गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना : विरोधकांची माघार : तानावडे यांच्या बाजूने 33 आमदारांचे बळ
प्रतिनिधी / पणजी
गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी गोव्यातील एकमेव राज्यसभा खासदार पदासाठी काल मंगळवारी अर्ज सादर केला आहे. उद्या गुरुवार 13 जुलै ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती, मात्र विरोधकांनी ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ धोरण स्वीकारत निवडणुकीपुर्वीच माघार घेत निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तानावडे यांची निवड निश्चित झाली आहे. गोव्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड होण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.
विद्यमान राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा कालावधी येत्या 28 जुलै रोजी संपुष्टात येणार असून तत्पूर्वी निवडणूक होणे बंधनकारक होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या देशभरातील 10 जागांसाठी निवडणूक जाहीर केली असून त्यात गोव्यातील या एका जागेचाही समावेश आहे. गोवा विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन या सदर निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी आहेत. तानावडे यांनी त्यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.
तानावडे यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत, आमदार चंद्रकांत शेट्यो व इतर आमदार उपस्थित होते. येत्या 24 जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान होणार होते.
तानावडेंनी भूषवली अनेक पदे
तानावडे यांनी गोवा प्रदेश भाजपमध्ये विविध पदे भूषवली असून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते भाजपचे सरचिटणीस होते तसेच थिवीचे आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. सध्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडे आर्थिक विकास महामंडळाचे (इडीसी) अध्यक्षपदही आहे.
भाजपकडे सध्या 28 आमदार असून मगोचे 2, अपक्ष 3 अशा प्रकारे 33 आमदारांचे पाठबळ तानावडे यांच्या मागे आहे. निवडणूक झाली असती तरीही त्यांचा विजय निश्चित होता.
विरोधकांचा राज्यसभा निवडणुकीवर बहिष्कार
सातही आमदारांच्या बैठकीत झाला निर्णय
राज्य विधानसभेतील सर्व 7 विरोधी आमदारांनी एकत्र बैठक घेऊन राज्यसभेसाठी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यसभेवर गोव्यातून भाजपचे उमेदवार सदानंद तानावडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्याची औपचारिक घोषणा होणे तेवढे बाकी आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्या मंत्रालयातील दालनात काल मंगळवारी सर्व विरोधी आमदारांची बैठक झाली. त्यात राजकीय रणनीती म्हणून राज्यसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरवण्यात आले. गोव्याच्या हितासाठी असा निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी केला. तशा आशयाचे प्रसिद्धी पत्रकही सर्व सात आमदारांच्या सहीनिशी जारी करण्यात आले आहे.
बैठकीला आलेमांव यांच्यासहीत कार्लुस फरेरा, अॅल्टॉन डिकॉस्ता हे तीन काँग्रेसचे आमदार तसेच गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आरजीचे विरेश बोरकर, आपचे आमदार व्हेन्सी व्हिएगश, व्रुझ सिल्वा यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत एकसंध राहून भाजपच्या विरोधात एकच उमेदवार देण्यावर चर्चा करण्यात आली. शिवाय येत्या 18 जुलैपासून सुऊ होणाऱ्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात सरकारला विविध विषयांवऊन कोंडीत पकडण्याचे ठरवण्यात आले. त्याबाबतचे प्रश्नही त्यांनी विधानसभेसाठी विचारलेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधकांकडे राज्यसभेसाठी सक्षम उमेदवार नाही आणि उमेदवार दिला तरी तो हरणार असल्याची खात्री पटल्याने त्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









