18 जुलै रोजी होणार अधिकृत घोषणा : विरोधकांसह सर्वांचे मानले आभार
विशेष प्रतिनिधी / पणजी
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काल गुऊवारी एकाही व्यक्तीने अर्ज सादर केला नसल्याने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर अखेर बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार त्यांच्या विजयाची घोषणा निवडणूक आयोग दि. 18 जुलै रोजी करणार आहेत.
गेल्या 30 वर्षांत राज्यसभेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना ठरली असून त्याचा मान सदानंद शेट तानावडे यांनी पटकाविला आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची गोव्यातून राज्यसभेवर दुसऱ्यांदा निवड झाली आहे. सदानंद शेट तानावडे हे पुढील 6 वर्षे राज्यसभेवर खासदार म्हणून राहतील.
विरोधकांसह सर्वांचे मानले आभार
बिनविरोध निवड झाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तानावडे यांनी सांगितले की, विरोधकांनी उमेदवार उभा केला नाही त्यामुळे निवडणूक घेण्याची वेळ आली नाही. आपल्याला या पदापर्यंत पोहोचविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच पक्षाच्या गोव्यातील सर्व कार्यकर्त्यांचे आपण आभार मानतो. तसेच गोव्यातील विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांचेही आपण आभार मानतो, असे ते म्हणाले.
पुढील 6 वर्षांमध्ये गोव्याला विकासकामात पुढे नेण्यासाठी डॉ. प्रमोद सावंत सरकारला आपण पूर्ण सहकार्य करणारच शिवाय राष्ट्रीय पातळीवर आवश्यक ती सर्व जबाबदारी आपण पूर्ण करणार, असे सदानंद शेट तानावडे म्हणाले. खासदार या नात्याने मिळणारा निधी गोव्यातील प्रकल्पांसाठी खर्च करीन व आपल्या हातून होईल, तेवढी सेवा बजावित राहीन, असेही तानावडे म्हणाले.









