आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही : लोकसभेला हवेत दोन मतदारसंघ
विशेष प्रतिनिधी / सांगली
Sadabhau Khot : नव्या नव्या वाड्यांच्या झगमगटात भाजपला आता आमची झोपडी दिसत नसेल. पण लवकरच ती दिसायला लागेल. आम्ही लोकसभेच्या केवळ दोन जागा मागितल्या आहेत द्यायच्या किंवा नाही ते त्यांना ठरवायचे आहे. आमच्याकडे गमावण्यासाठी काही नाही. आम्ही पुन्हा उभे राहू नव्या दिशेने काम करत जाऊ असा संताप रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. माजी मंत्री खोत यांनी नुकताच विदर्भाचा दौरा पूर्ण केला असून बुलढाणामध्ये आपल्या दौऱ्याची सांगता कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करून ते परतले आहेत. खोत यांनी स्वतःसाठी हातकणंगलेसह दोन लोकसभा मतदारसंघ रयत क्रांतीसाठी सोडण्याची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणीस मंत्रिमंडळात त्यांना कृषी राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. त्यावेळी राज्यातील शेतकरी संपाबरोबरच अनेक महत्त्वाचे विषय हाताळण्यात सदाभाऊंचा पुढाकार होता. मात्र गेले अकरा महिने रयत क्रांतीकडे भाजपचे दुर्लक्ष आहे.
त्याबाबत बोलताना खोत म्हणाले, भाजप सध्या मोठ्या वाड्यावर आहे म्हणून त्यांना आमची झोपडी दिसत नसावी. आमचे म्हणणेही ऐकू येत नसावे. आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. आम्ही आमची वाट स्वतः निवडू शकतो. पण वाड्याच्या झगमगटा पलीकडे जेव्हा त्यांना दिसेल तेव्हा फक्त आम्हीच असू. पूर्वी त्यांना आमची झोपडी दिसायची आमच्यासोबत ते वावरायचे, आम्हाला बळ द्यायचे. आता नसेल पण लवकरच त्यांना आमचे झोपडे दिसायला लागेल याची मला खात्री आहे असेही ते म्हणाले.