वृत्तसंस्था/ जयपूर
लोकसभा निवडणूक नजीक आल्याने राजस्थानाता काँग्रेस अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसून येता अहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे नेते विविध मतदारसंघांचा फीडबॅक घेत आहेत. अशा स्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा हे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावर टीका करत आहे. गजेंद्र सिंह शेखावत हे मुख्यमंत्री न झाल्याचे मला दु:ख आहे. दिल्लीतून आलेल्या एका चिठ्ठीने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रिपद मिळवून दिले, परंतु जे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते ते निराश झाल्याची उपरोधिक टीका डोटासरा यांनी केली आहे.
राजस्थानात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविली. भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री होतील अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. गजेंद्र सिंह शेखावत यांना मुख्यमंत्री न होता आल्याचे दु:ख मला देखील आहे. राजेंद्र राठौड, वसुंधरा राजे या देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या. जनतेने याच नेत्यांना नजरेसमोर ठेवून मतदान केले होते असा दावा डोटासरा यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील 15 जागांवर काँग्रेस विजयी होणार असल्याचा दावा डोटासरा यांनी केला आहे.









