50 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुंबईत साधला पत्रकारांशी मुक्त संवाद : 25 षटकांचे चार डाव करण्याची केली सूचना :
वृत्तसंस्था/ मुंबई
वनडे क्रिकेटमध्ये सध्या निकालात नाणेफेक जवळपास 90 टक्के निर्णायक ठरते. त्याचे महत्त्व कमी करण्यासाठी वनडेमध्ये 25 षटकांनंतर डावाला ब्रेक असावा, अशी सूचना सचिन तेंडुलकरने शुक्रवारी केली. भारतरत्न सचिन तेंडुलकर येत्या 24 तारखेला अर्धशतक पूर्ण करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्याने पत्रकारांशी संवाद साधला. यात त्याने अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. काही मजेशीर किस्से देखील सांगितले.

सचिन तेंडुलकर यांनी शुक्रवारी निवडक पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या वाटचालीत सातत्याने साथ देणाऱ्या माध्यमांचे आभार मानले. यावेळी बोलताना सचिनने सांगितले की, ‘पाठीवर पडलेली कौतुकाची थाप आयुष्यात कामगिरी उंचावण्यासाठी अधिक महत्त्वाची असते. माध्यमांनी नेहमी माझे कौतुक केल्यामुळेच मला क्रिकेट खेळताना कठोर परिश्रम करण्यासाठी बळ मिळाले. माझ्या आयुष्यात अपयशही आले, मी कायमच यशस्वी ठरलो नाही. मात्र क्रिकेटने मला माझ्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली आणि अपयशानंतर वाटचाल करण्यासाठी आवश्यक असणारे इंधन तुम्ही मला दिलेत. तुमच्या मदतीविना मी हा टप्पा पार केला नसता, असे त्याने उपस्थित असलेल्या पत्रकारांना आपुलकीने संवाद साधताना वक्तव्य केले.
वनडेत नाणेफेकीचे महत्व कमी करण्याची गरज
वनडे क्रिकेटमध्ये सध्या निकालात नाणेफेक जवळपास 90 टक्के निर्णायक ठरते. त्याचे महत्त्व कमी करण्यासाठी वनडे मध्ये 25 षटकांनंतर डावाला ब्रेक असावा, अशी सूचना सचिनने यावेळी केली. वनडे सामन्याच्या निकालात नाणेफेक निर्णायक ठरत आहे. दुसऱ्या डावाच्या वेळी दवामुळे खेळपट्टी आणि मैदान ओलसर होते. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून साथ मिळत नाही; तसेच वेगवान गोलंदाजांना चेंडू स्विंगही करता येत नाही. त्यामुळे डावांचे विभाजन करण्याची गरज आहे. यामुळे दोन्ही संघ कोरड्या आणि ओलसर वातावरणात फलंदाजी आणि गोलंदाजी करतील. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव 25 षटकांनंतर थांबवण्यात येईल. धावांचा पाठलाग करणारा संघ त्यानंतर आपली 25 षटके खेळणार. प्रथम फलंदाजी करणारा संघ त्यानंतरची उर्वरित 25 षटके खेळण्यास सुरुवात करेल. यावेळी पहिल्या 25 षटकांतील डावच पुढे सुरू होईल. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ 25 षटके फलंदाजी करील. यामुळे कोणत्याही संघास प्रतिकूल किंवा अनुकूल परिस्थितीचा फायदा मिळणार नाही, असे सचिनने सांगितले.
मुंबई-पंजाब सामन्यादरम्यान सचिन…सचिन…चा जयघोष
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 24 एप्रिल रोजी 50 वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण एक दिवस आधीच मुंबई इंडियन्सकडून स्पेशल सेलिब्रेशन करण्यात आले. वानखेडे स्टेडियमवर शनिवारी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना सचिनच्या चेहऱ्याचे मास्क देण्यात आले. याशिवाय गरवारे गेटच्या समोर एक खास तेंडुलकर सेट उभारण्यात आला असून याठिकाणी सेल्फी क्लिक करता येणार आहे.
सचिन…..सचिन…..
पंजाबविरुद्ध सामन्यादरम्यान सचिन सचिन असा आवाज पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर घुमल्याचे चित्र पहायला मिळाले. भारताची दहा नंबरची जर्सी, त्यानतंर मुंबई इंडियन्सची जर्सी आणि पहिल्या डावातल्या दहाव्या षटकाच्या अखेरीस सचिन सचिन असा आवाज स्टेडियम व्यापून टाकल्याचे यावेळी पहायला मिळाले.









