वृत्तसंस्था/मुंबई
2024 च्या हंगामात होणाऱ्या 11 व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेसाठी येथे आयोजित केलेल्या कबड्डीपटूंच्या लिलावामध्ये सचिन तनवार आणि मोहम्मदेझा शदलोई हे सर्वात महागडे कबड्डीपटू ठरले. कबड्डीपटूंच्या लिलावामध्ये एकूण 8 कबड्डीपटूंवर प्रत्येकी 1 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.
प्रमुख रायडर सचिन तनवार तसेच इराणचे कबड्डीपटू मोहम्मदेझा शदलोई यांच्यावर सर्वात अधिक बोली लावण्यात आली होती. कॅटेगिरी अ मधील झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी तामिळ थलैवास संघाने सचिन तनवारवर 2.15 कोटी रुपयांची बोली लावली गेली. तर इराणचा अष्टपैलु शदलोई याला हरियाणा स्टिलर्स संघाने 2.07 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केली. तेलगु टायटन्सने भारताचा अव्वल कबड्डीपटू पवन सेहरावतला 1.725 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले. गेल्या वर्षी प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील पवन सेहरावत हा सर्वात महागडा कबड्डीपटू ठरला होता. यु मुंबा संघाने सुनीलकुमारला 1.015 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले. गुजरात जायंटस्ने प्रमुख रायडर गुरमानसिंगला 1.97 कोटी रुपयांच्यावर खरेदी केले. बंगाल वॉरियर्सने मनिंदरसिंगवर 1.15 कोटी रुपयांना बोली लावली. बेंगळूर बुल्सने अजिंक्य पवारला 1.107 कोटी रुपयांना खरेदी केली. शुभम शिंदेला पाटणा पायरेटस्ने 70 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले. जयपूर पिंक पॅंथर्सने सुरजित सिंगला 60 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले.









