जयपूर / वृत्तसंस्था
माझ्या धीरोदात्त वृत्तीसंबंधी कोणतीही शंका कोणी घेऊ नये, असा उपहासात्मक दिलासा राजस्थानातील काँग्रेस नेते सचिन पायटल यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँगेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पायलट यांच्यासंबंधी प्रशंसोद्गार काढले होते. त्यामुळे गेहलोत यांनी पायलट यांच्या पक्षनिष्ठेसंबंधी टीकात्मक टिप्पणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पायलट यांनी आपल्या संयमाची आठवण त्यांना करुन दिली.
महाराष्ट्रात सध्या ज्या घटना घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर पायलट आणि गेहलोत यांच्या मतभेदांकडे पाहिले जात आहेत. 2020 मध्ये पायलट यांनी गेहलोत यांच्या विरोधात बंड पुकारले होते. आपल्या गटाच्या 18 आमदारांसह ते हरियाणात काही दिवस वास्तव्यास होते. तथापि, पुरेशा प्रमाणात आमदारांना जमविण्यात अपयश आल्याने त्यांना बंड आवरते घ्यावे लागले होते. त्या बंडाचे पडसाद राजस्थानच्या राजकारणात आजही उमटत असतात.
राहुल गांधींकडून प्रशंसा
काँगेस सर्वांना संयमाची शिकवण देते. सचिन पायटल हे या संयमाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी त्यांच्या महत्वाकांक्षांना पक्षहितासाठी आवर घातला आहे, असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले होते. तथापि, गेहलोत गटाने यातून वेगळा अर्थ काढत राहुल गांधी यांनी पायलट यांना हा टोला लगावला आहे, अशी टिप्पणी गेहलोत गटातील काही नेत्यांनी केली होती. प्रत्यक्ष मुख्यमंत्री गेहलोत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शांती धारीवाल यांनी पायलट यांना त्या बंडाची आठवण करुन देत या बंडाला उद्देशूनच राहुल गांधी यांनी पायलट यांचे उपहासात्मक कौतुक केल्याचा दावा केला होता. मात्र राहुल गांधी यांच्या विधानांचा सकारात्मक अर्थ काढणे आवश्यक असल्याचे मत पायलट यांचे आहे.
वादावादीला फुटले तोंड
यापूर्वी गेहलोत यांनी पायलट यांचा उल्लेख निकम्मा, नकारात्मक मनोवृत्तीचा आदी अवमानजक शब्दांमध्ये केला होता. तथापि, आपण त्यासंबंधी आक्षेप घेतला नव्हता. अशा असभ्य भाषेकडे आपण दुर्लक्ष करतो, असेही पायलट यांचे म्हणणे आहे. एकंदर, राजस्थानातही आता वादावादीला तोड फुटले आहे.









