सामनावीर पवन नेगी : 16 धावांत 2 बळी व 3 झेल
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
माजी महान फलंदाज मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा खेळताना दिसत असून त्याने येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमधील सामन्यात 21 चेंडूत 34 धावा फटकावल्या. त्याने व गुरकीरत मान (35 चेंडूत 10 चौकार, 1 षटकारासह नाबाद 63) यांनी 75 धावांची सलामी देत इंडिया मास्टर्सला इंग्लंड मास्टर्स संघावर 9 गड्यांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
इंग्लंड मास्टर्सच्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया मास्टर्सने 11.4 षटकांतच विजयाचे उद्दिष्ट गाठले. कर्णधार तेंडुलकरने डीवाय पाटील स्टेडियमवर उपस्थित असणाऱ्या खुश करणारी खेळी करताना 5 चौकार, एक षटकार ठोकला. ख्रिस स्कोफील्डने त्याला बाद केले. गुरकीरत मानने सर्वाधिक नाबाद 63 धावा जमविल्या तर विक्रमवीर युवराज सिंगने केवळ 14 चेंडूत नाबाद 4 चौकार, 1 षटकारासह नाबाद 27 धावा तडकावल्या. इंडिया मास्टर्सचा हा सलग दुसरा विजय आहे.
तत्पूर्वी, इंडिया मास्टर्सकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर इंग्लंड मास्टर्सने 20 षटकांत 8 बाद 132 जमविल्या. डरेन मॅडी (25), टिम अॅम्ब्रोज (23) यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. सीमर धवल कुलकर्णीने भेदक मारा करीत 21 धावांत 3 तर अभिमन्यू मिथुनने 27 धावांत 2 व डावखुरा स्पिनर पवन नेगीने 16 धावांत 2 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड मास्टर्स 20 षटकात 8 बाद 32, इंडिया मास्टर्स 11.4 षटकांत 1 बाद 133 (गुरकीरत सिंग नाबाद 63, सचिन तेंडुलकर 34, युवराज सिंग नाबाद 27).









