आकर्षक कुस्तीत श्रीनाथ गुरव गदेचा मानकरी, बिजगर्णी कुस्ती मैदानात हजारो शौकिनांची उपस्थिती

बेळगाव / किणये
बिजगर्णी येथील कुस्तीगीर संघटना व श्री कलमेश्वर फार्मस प्रोसेसिंग सोसायटी आयोजित महाशिवरात्रीनिमित्त भव्य कुस्ती मैदानात सचिन चव्हाणने शिवाप्पा दड्डीचा नवव्या मिनिटाला घुटणा डावावरती चारीमुंड्या चीत करीत उपस्थित 10 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सचिन उर्फ पप्पु चव्हाण-माने सांगली व कर्नाटक चॅम्पियन शिवा दड्डी-दर्गा तालिम ही कुस्ती मोनाप्पा भास्कळ, खानापूर कुस्तिगीर संघटना, बिजगर्णी ग्राम पंचायत व भास्कर परिवार यांच्या हस्ते लावण्यात आले. पहिल्याच मिनिटाला सचिनने शिवाला पायाला चाट मारुन खाली घेत घिस्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून शिवाने सुटका करुन घेतली. तिसऱ्या मिनिटाला सचिनने दोन्ही हाताचे हप्ते भरुन शिवाला खाली घेत एकचाकवरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण खालुन डंकी मारुन शिवाने सचिनवर कब्जा मिळविला.

मानेवरती घुटना ठेवून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या सचिनला फिरविणे कठीण गेले. आठव्या मिनिटाला सचिनने एकेरीपट काढून शिवाला खाली घेत घुडण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. परंतु घुटणा मजबुत न बसल्याने त्यातून शिवाने सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करत असतानाच नवव्या मिनिटाला सचिनने दुहेरीपट काढून खाली घेत मानेवरती मजबूत घुटणा ठेवून घुटण्यावर चारीमुंड्या चीत करीत उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कुबेर रजपूत-मिरज व विक्रम-शिनोळी ही कुस्ती नामदेव घाडेकर, आर. बी. देसाई, पांडुरंग पाटील, डॉ. हुंदरे व मोनाप्पा भास्कळ यांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला कुबेर रजपूतने एकेरीपट काढून विक्रम शिनोळीला खाली घेतले. पण विक्रमने त्यातून सुटका करुन घेतली. दुसऱ्याच मिनिटाला कुबेरने हप्ते भरुन विक्रमला हप्ते डावावरती चीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण विक्रम शिंनोळीने खालुन डंकी मारुन त्यातून सुटका करुन घेतली.

सहाव्या मिनिटाला विक्रम शिनोळीने दुहेरीपट काढून कुबेरला खाली घेतले व मानेवर घुटणा ठेवून फिरविण्याचा प्रयत्न केला. त्यातून कुबेरने सुटका करुन घेतली. 18 व्या मिनिटाला विक्रमने कुबेरला खाली घेवून घिस्सावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण कुबेरने मैदानातून काढता पाय घेतल्याने विक्रम शिनोळीला विजयी घोषित केले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व युवराज मेथर-कोल्हापूर ही कुस्ती सचिन मंडोळकर, अरुण गुरव यांच्या हस्ते लावण्यात आली. चौथ्या मिनिटाला पृथ्वीराजने एकेरीपट काढून युवराजला खाली घेत सातव्या मिनिटाला एकचाक डावावरती चीत केले. चौथ्या क्रमांकाची कुस्ती राजू शिनोळी व प्रवीण चौगुले-कोल्हापूर यांची होती. ही कुस्ती पत्रकारांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत राजू शिनोळीने एकलांगी डावावरती नेत्रदीपक विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्ती शुभम पाटील-राशिवडे व महेश बिर्जे ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंझली पण वेळेअभावी सोडविण्यात आली. सहाव्या क्रमांकाची कुस्ती विनायक-येळ्ळूरने प्रवीण-निलजीचा सालतो डावावरती विजय मिळविला. सातव्या क्रमांकाची कुस्ती मृणाल पाटील-राशिवडेने ओम कंग्राळीचा झोळी डावावरती पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत अजित पाटील-बडसने श्रीघाडीचा निकाल डावावरती पराभव केला. केशव सांबराने रोहीत तीर्थकुंडेयचा निकाली डावावर त्याच प्रमाणे मृणाल-खादरवाडी, समीर पठाण, सनय तुर्केवाडी, समर्थ डुकरे-किणये, स्वप्नील-सावगांव, प्रथमेश शिनोळी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला.

आकर्षक कुस्तीत मराठा रॉयल संघटनेचे पदाधिकारी कॅप्टन रामचंद्र पाटील, सुभेदार मेजर हणमंत गुरव, कॅप्टन चांगाप्पा पाटील, सुभेदार मेजर बलराम गुरव, पी. आर. पाटील, राजाराम गवस, रवी पाटील यांच्या हस्ते गदेची कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत श्रीनाथ गुरव-बेळगुंदीने झोळी डावावरती सोहम खादरवाडीचा पराभव करुन गदेचा मानकरी ठरला. दुसऱ्या आकर्षण कुस्तीत स्वंभव शिनोळीने प्रकाश पाटीलचा घुटण्यावरती पराभव केला. अंबार बिजगर्णीने आकाश पुजारी-निट्टूरचा एकचाक डावावरती पराभव केला. आखाड्याचे पंच म्हणून हणमंत गुरव, मालोजी येळ्ळूर, नामदेव सांबरेकर, मल्लाप्पा येळ्ळूर, परशराम गुरव, शिवाजी कडोलकर यांनी काम पाहिले. आकर्षक कुस्तीत यादु मोरे-तुर्केवाडीने सांगलीच्या राकेशचा गदेलोट डावावरती नेत्रदीपक विजय मिळविला. यळगूडच्या आवटे बंधूंनी आपल्या हलगीवर सर्व कुस्तीशौकिनांना खिळवून ठेवले.
57 वर्षीय बबनचा प्रेक्षणीय विजय
येळ्ळूरचा बिबट्या म्हणून समजलेल्या बबन येळ्ळूर याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत करुन तरुणांना लाजविले. त्याने अवघ्या मिनिटांत कुस्ती निकाल करुन उपस्थितांची मने जिंकली. त्याचीही या वयोतील चपळाई पाहून कुस्ती शौकिन चकित झाले. पुढेही आपण कुस्त्या करणार असल्याचे त्याने सांगितले.









