अहमदाबाद/ वृत्तसंस्था
2024-25 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील सोमवारपासून येथे सुरू झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार सचिन बेबीच्या नाबाद अर्धशतकाने केरळचा पहिला डाव सावरला. दिवसअखेर केरळने गुजरातविरुद्ध 89 षटकात 4 बाद 206 धावा जमविल्या.
या उपांत्यफेरीच्या सामन्यात केरळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत केरळचा फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखले. अक्षय चंद्रन आणि रोहन कुन्नूमल या सलामीच्या जोडीने 20 षटकात 60 धावांची भागीदारी केली. गुजरातच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे केरळचा सलामीचा फलंदाज अक्षय चंद्रन धावचीत झाला. त्याने 71 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. यानंतर गुजरातच्या रवी बिस्नॉईने कुन्नूमलला पायचीत केले. त्याने 68 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. उपाहरावेळी केरळने 33 षटकात 2 बाद 70 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या दुसऱ्या सत्रात प्रारंभ झाल्यानंतर गुजरातच्या पी. जडेजाने नयनारला 10 धावावर झेलबाद केले. कर्णधार सचिन बेबी आणि सक्सेना यांनी चौथ्या गड्यांसाठी 71 धावांची भागीदारी केली. चहापानावेळी केरळने 61 षटकात 3 बाद 143 धावा जमविल्या होत्या. सचिन बेबी 42 तर सक्सेना 26 धावावर खेळत होते.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये केरळने आणखी एक गडी गमविला. नागवासवलाने सक्सेनाचा त्रिफळा उडविला. त्याने 83 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा जमविल्या. कर्णधार सचिन बेबीने 132 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. सचिन बेबीला अझरूद्दिनकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने दिवसअखेर पाचव्या गड्यासाठी अभेद्य 49 धावांची भागीदारी केली. सचिन बेबी 8 चौकारांसह 69 तर अझरूद्दिन 3 चौकारांसह 30 धावावर खेळत आहेत. गुजराततर्फे पी. जडेजा, बिस्नॉई आणि नागवासवला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. यजमान गुजरातने 2016-17 नंतर मिळविलेल्या रणजी चषकानंतर पहिल्यांदाच यावेळी अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. मात्र केरळने पहिल्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न ठेवले आहेत. 36 वर्षीय सचिन बेबीचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 28 वे अर्धशतक आहे.
संक्षिप्त धावफलक : केरळ प. डाव : 89 षटकात 4 बाद 206 (सचिन बेबी खेळत आहे 69, अझरूद्दिन खेळत आहे 30, अक्षय चंद्रन 30, कुन्नूमल 30, नयनार 10, सक्सेना 30, अवांतर 7, नागवासवला, बिस्नॉई आणि पी. जडेजा प्रत्येकी 1 बळी).









