Sachin Ahir : दिवाळी निमित्त भाजपकडून मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव हा कार्यक्रम जांबोरी मैदान,वरळी येथे पार पडला. यावेळी गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा अपमान भाजपनं केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी ट्वीट करत केला आहे.यामध्ये त्य़ांनी व्हिडिओ शेअर केला आहे. हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!! अशी टॅगलाईन देऊन भाजपला खिंडित पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.त्यांच्या या ट्विटनंतर भाजपने देखील ट्विट करत उत्तर दिले आहे. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनीही ठाकरे गटावर टिका केली आहे.
काय म्हणाले ट्विट करत सचिन अहिर
हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!! भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी .मराठी कलाकारांची चेष्टा…….. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) सत्कार करण्यात आला आहे. यावरून अहिर यांनी भाजपने दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, मराठी अस्मिता जपण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाने केला तो दुर्देवाने अपयशी ठरला. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या आधी का झाला नाही.चांगल्या कलाकारांना व्यासपीठावर बोलवून सादरीकरण करू दिल नाही. याबाद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, वरळीत कोणीही यावे आणि कार्यक्रम करावे पण त्यांनी कलाकरांचा अवमान करू नये. तसेच ही अस्मिता पुढील पाच वर्ष टिकवणार आहेत का? असा सवाल देखील केला आहे.
भाजपने ट्विट करत दिले उत्तर
सचिन अहिर यांना टॅग करत भाजपने ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात की, एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचा सन्मान करत थांबतोय,तरीही घटनेचा विपर्यास करण्याचा करंटेपणा केला जात आहे. हे सत्ता गेल्याचं दुःख आहे,की पहिल्यांदा मु्ंबईत मराठीसण जोशात साजरे केले जाण्याची पोटदुखी ? असा सवाल भाजपने केला आहे.
काय म्हणाले आशिष शेलार
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव रडकी सेना असं ठेवावं. ते स्वत: कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करत नाहीत. कार्यक्रमात कोणाचाही अपमान झालेला नाही. मराठी माणसांच्या मराठमोळ्या दीपोत्सवामध्ये बॉलिवूडमधील कलाकार देखील येत आहेत, हा मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. ‘
Previous Articleदिल्लीतील फटाके बंदी विरोधातील याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली
Next Article केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात ‘आप’चा ठिय्या








