वृत्तसंस्था /ग्वाडालाजारा (मेक्सिको)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या ग्वाडालाजारा खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ग्रीसची द्वितीय मानांकित मारिया सॅकेरी तसेच सोफिया केनिन यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इटलीची जॉर्जी आणि ओस्टापेंको यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. ग्रीसच्या द्वितीय मानांकित सॅकेरीने इटलीच्या जॉर्जीचा तासभराच्या कालावधीत 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. ग्रीसची सॅकेरी आणि कोलंबियाची अॅरॅनगो यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. 22 वर्षीय अॅरॅनगोने अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडचा 7-5, 1-6, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अन्य एका सामन्यात सोफिया केनिनने आठव्या मानांकित ओस्टापेंकोवर 6-4, 7-5 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. केनिन आणि कॅनडाची लैला फर्नांडिज यांच्यात पुढील फेरीतील सामना होईल. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या कॅरोलिनी गार्सियाने अमेरिकेच्या हेली बॅप्टिस्टीचा 7-5, 6-4, कॅरोलिनी डुलेडीने आठव्या मानांकित अॅलेक्सेंड्रोवाचा 6-1, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.









