वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2025 च्या डायमंड लीग सिरीज अॅथलेटिक हंगामातील चीनमधील झिमेन येथे 26 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या स्पर्धेत भारताचा दीर्घ पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे सहभागी होणार आहे. 26 एप्रिल रोजी होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा अविनाश साबळे तसेच मोरोक्कोचा विद्यमान ऑलिम्पिक आणि विश्वविजेता सोफेनी बॅकेली, पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता केनियाचा अब्राहम किबीओट यांचा समावेश राहील. पुरूषांच्या 3000 मी. स्टिपल चेस प्रकारात अविनाश साबळे हा राष्ट्रीय विक्रमवीर आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 30 वर्षीय अविनाश साबळेला पुरुषांच्या 3000 मी. स्टिपल चेसमध्ये 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. तसेच येत्या सप्टेंबरमध्ये टोकियोत होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी अविनाश साबळे यापूर्वीच पात्र ठरला आहे.









