मुख्यमंत्र्यांकडे करणार सचिव बदलाची मागणी : अभियंत्यांची 50 पदे रिक्त असल्याने अडचण
प्रतिनिधी /पणजी
ऐन पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी शासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याने भाजपमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आपल्याकडे फाईल्स उशिरा पाठविल्या जातात. खात्याचे सचिव स्वतः मुख्य सचिव पुनित गोयल हे असून त्यांच्याकडील सा.बां. खाते काढून घेण्याची मागणी मंत्री काब्राल हे आता मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.
सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी पुन्हा एकदा सरकारी कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे. सा. बां. खात्यात अभियंत्यांच्या 50 जागा रिक्त असून ती पदे भरली जात नसल्याने खात्याची अनेक कामे प्रलंबित आहेत. रस्ते, पाणी या जनतेच्या मूलभूत गरजा आहेत. त्या जनतेला प्राप्त करुन देणे हे आमचे कर्तव्य आहे. तथापि, पुरेसे मनुष्यबळाअभावी ही कामे पूर्ण होत नाहीत. प्रशासकीय अधिकाऱयांकडून पदे भरण्यास टाळाटाळ होत आहे. ही पदे भरली तर अनेक विकास प्रकल्प पूर्ण करणे शक्य होईल.
या खात्याचे सचिव म्हणून काम करणारे पुनित गोयल हे आता मुख्य सचिव आहेत. त्यांना सातत्याने कामे असल्याने ते सा. बां. खात्याकडे पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे फाईल्स पुढे जात नाहीत व आपल्याकडे देखील उशिराच फाईल्स येतात. त्यातच अभियंत्याच्याच 50 जागा रिक्त आहेत. अशावेळी कामे होणार तरी कशी? असा सवाल त्यांनी पत्रकारांकडे व्यक्त केला आणि प्रशासनाच्या कारभारावरच नाराजी व्यक्त केली. आपण या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असेही ते पुढे म्हणाले.









