वृत्तसंस्था/ माद्रिद
माद्रिद मास्टर्स 1000 दर्जाच्या एटीपी टूरवरील पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत टॉप सिडेड आर्यना साबालेंकाने एकेरीचे जेतेपद पटकाविताना अमेरिकेच्या चौथ्या मानांकित कोको गॉफचा पराभव केला.
सदर स्पर्धा क्लेकोर्टवर खेळविण्यात आली होती. साबालेंकाने अंतिम सामन्यात गॉफचा 6-3, 7-6 (7-3) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले. साबालेंकाने ही स्पर्धा यापूर्वी 2021 आणि 2023 साली जिंकली होती. साबालेंकाचे या स्पर्धेतील हे तिसरे जेतेपद असून तिने झेकच्या पेत्रा क्विटोव्हाच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. 2025 च्या टेनिस हंगामातील साबालेंकाचे हे तिसरे विजेतेपद असून यापूर्वी तिने ब्रिस्बेन आणि मियामी टेनिस स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत पुरुष एकेरीत जॅक ड्रेपर आणि कास्पर रुड यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.









