वृत्तसंस्था / माद्रीद
2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स 1000 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष विभागात जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने एकेरीत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. मात्र या स्पधेंतील विद्यमान विजेता रशियाचा रुबलेव्ह याला मात्र बुबलीककडून हार पत्करावी लागली. महिलांच्या विभागात टॉपसिडेड साबालेंकाने मर्टन्सवर शानदार विजय मिळविला.
पुरुष एकेरीच्या सामन्यात जर्मनीच्या टॉपसिडेड व्हेरेव्हने फोकिनाचा 3-6, 6-2, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. व्हेरेव्हने यापूर्वी दोनवेळा माद्रीद मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली आहे. अन्य एका सामन्यात अॅलेक्सझांडेर बुबलीकने विद्यमान विजेत्या रशियाच्या रुबलेव्हचे आव्हान 6-4, 0-6, 6-4 असे संपुष्टात आणत चौथी फेरी गाठली. या स्पर्धेत बुबलीकने आतापर्यंत चारवेळा चौथ्या फेरीत स्थान मिळविले आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत रशियाच्या रुबलेव्हने अॅलिसीमेचा पराभव करत जेतेपद मिळविले होते.
महिलांच्या विभागात टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने इलेसी मर्टन्सचा 3-6, 6-2, 6-1 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. साबालेंकाने यापूर्वी ही स्पर्धा 2021 आणि 2023 साली जिंकली होती तर गेल्या वर्षी या स्पर्धेत पोलंडच्या स्वायटेकने साबालेंकाचा पराभव करुन विजेतेपद मिळविले होते.









