वृत्तसंस्था/रियाद
2025 च्या टेनिस हंगामाअखेरीस येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए फायनल्स महिलांच्या टेनिस स्पर्धेत आता बिली जिन किंग चषकासाठी बेलारुसची टॉपसिडेड आर्याना साबालेंका आणि कझाकस्तानची इलिना रायबाकिना यांच्यात जेतेपदासाठी लढत होत आहे.
साबालेंका आणि रायबाकिना या दोघींमध्ये दोन वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत गाठ पडली होती. आतापर्यंत या दोघींच्यात 13 सामने झाले असून साबालेंकाने 8 तर रायबाकिनाने 5 सामने जिंकले आहेत. डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात साबालेंकाने अमेरिकेच्या अमंदा अॅनिसिमोव्हाचा 6-3, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत साबालेंका आणि अॅनिसिमोव्हा यांच्यात अंतिम लढत झाली होती आणि साबालेंकाने विजेतेपद पटकाविले होते. साबालेंका आणि अॅनिसिमोव्हा यांच्यात आतापर्यंत 8 सामने झाले असून त्यापैकी पाच सामने साबालेंकाने तर तीन सामने अॅनिसिमोव्हाने जिंकले आहेत.
साबालेंका आणि अॅनिसिमोव्हा यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिला सेट तासभर चालला होता. साबालेंकाने बेसलाईन खेळावर अधिक भर देत अॅनिसिमोव्हावर 5-3 अशी आघाडी मिळविली होती. मात्र साबालेंकाने आपल्या खेळाच्या तंत्रात बदल करत अॅनिसिमोव्हाला वारंवार नेटजवळ खेचल्याने तिच्याकडून दुहेरी चूका झाल्या आणि त्याचा लाभ साबालेंकाला मिळाला. पहिला सेट जिंकल्यानंतर अॅनिसिमोव्हाने आपल्या डावपेचात बदल करत आपली वेगवान सर्व्हिस अधिक काळ राखत हा सेट 6-3 असा जिंकून साबालेंकाशी बरोबरी साधली. अपेक्षेप्रमाणे तिसरा सेट चुरशीचा झाला. पण साबालेंकाने दमछाक झालेल्या अॅनिसिमोव्हाला केवळ तीन गेम्स जिंकण्याची संधी दिली. अखेर बॅकहँड फटक्यावर साबालेंकाने आपला विजय नोंदविला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकस्तानच्या इलिना रायबाकिनाने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा 4-6, 6-4, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीतन प्रवेश मिळविला. या लढतीमध्ये पेगुलाने आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर पहिला सेट 6-4 असा जिंकून रायबाकिनावर आघाडी मिळविली. मात्र त्यानंतरच्या दोन सेट्समध्ये तिच्याकडून वारंवार चुका झाल्याने तिला आपली सर्व्हिस गमवावी लागली. रायबाकिनाने आपल्या बेसलाईन खेळावर तसेच वेगवान फोर हँड फटक्याच्या जोरावर पेगुलाचे आव्हान संपुष्टात आणले. या लढतीमध्ये पेगुलाकडून 25 दुहेरी चुका नोंदविल्या गेल्या. रायबाकिना आणि साबालेंका या दोन्ही टेनिसपटूंना पहिल्यांदाच बिली जिंग किंग चषक मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रायबाकिनाने या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करताना एकही सामना गमविलेला नाही. रायबाकिनाने या सामन्यात 15 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.









