विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस : होल्गर रुने, युबँक्स, मॅडिसन कीज, इलेना रायबाकिना यांचे आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था /लंडन
स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अल्कारेझ, रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, आर्यना साबालेन्का, ट्युनिशियाची ऑन्स जेबॉर यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठली. होल्गर रुने, ख्रिस्तोफर युबँक्स, मॅडिसन कीज व विद्यमान चॅम्पियन इलेना रायबाकिना यांचे आव्हान संपुष्टात आले. अल्कारेझ व होल्गर रुने या दोन 20 वर्षीय युवा खेळाडूंतील लढत चुरशीची झाली. अल्कारेझने रुनेवर 7-6 (7-3), 6-4, 6-4 अशी मात करीत विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदाच प्रवेश मिळविला. अल्कारेझचा या मोसमातील टूर लेव्हलवरचा हा 45 वा विजय आहे. ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही एकूण तिसरी वेळ असून रुनेविरुद्ध त्याचे विजयाचे रेकॉर्ड 2-1 असे झाले आहे. त्याची पुढील लढत जागतिक तिसऱ्या मानांकित मेदवेदेव्हशी होईल. रशियाच्या मेदवेदेव्हने पाच सेट्सच्या झुंजीत ख्रिस्तोफर युबँक्सवर 6-4, 1-6, 4-6, 7-6 (7-4), 6-1 असा विजय मिळवित शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. युबँक्स हा चार महिन्यापूर्वी पहिल्या 100 खेळाडूंमध्येही नव्हता. पण येथील त्याच्या जबरदस्त प्रदर्शनानंतर त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महिला एकेरीत द्वितीय मानांकित साबालेन्काने उपांत्य फेरी गाठताना अमेरिकेच्या 25 व्या मानांकित मॅडिसन कीजचे आव्हान 6-2, 6-4 असे संपुष्टात आणले. तिने पुढील सामना जिंकला तर इगा स्वायटेकचे अग्रस्थान तिला मिळू शकेल. 67 आठवड्यापासून स्वायटेक अग्रस्थानावर आहे. तिची उपांत्य लढत सहाव्या मानांकित ऑन्स जेबॉरशी होईल. याआधीच्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांत उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारणारी साबालेन्का ही एकमेव महिला टेनिसपटू आहे. जेबॉरने विद्यमान चॅम्पियन इलेना रायबाकिनाला तीन सेट्सच्या चुरशीच्या लढतीत 6-7 (5-7), 6-4, 6-1 असा पराभवाचा धक्का दिला.
बोपण्णा-एब्डन उपांत्य फेरीत दाखल
भारताचा रोहन बोपण्णा व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डन यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅमच्या पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली असून या सहाव्या मानांकित जोडीने बिगरमानांकित नेदरलँड्सची जोडी बार्ट स्टीव्हन्स व टॅलन ग्रीकस्पूर यांच्यावर 6-7 (3-7), 7-5, 6-2 अशी मात केली. पहिल्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांत जोरदार चुरस पहावयास मिळाली. पण प्रतिस्पर्धी जोडीने टायब्रेकरपर्यंत लांबलेला हा सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण रोहन-एब्डन यांनी नंतरचे दोन सेट जिंकून शेवटच्या चार फेरीतील स्थान निश्चित केले. बोपण्णाने या मोसमात सानिया मिर्झासमवेत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपवेजेतेपद मिळविले तर एब्डनसमवेत दोन एटीपी स्पर्धांही जिंकल्या आहेत. त्यांची पुढील लढत अग्रमानांकित वेस्ली कूलहॉफ व नील स्कुपस्की यांच्याशी होणार आहे. इंडियन वेल्समध्ये बोपण्णा-एब्डन यांनी त्यांना हरविले होते.









