वृत्तसंस्था / बर्लिन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या बर्लिन खुल्या ग्रासकोर्ट महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने इलिना रायबाकिनाचा पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साबालेंकाने रायबाकिनाचा 7-6 (8-6), 3-6, 7-6 (8-6) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. या लढतीत दोन सेट्स टायब्रेकरपर्यंत रंगले. आता साबालेंकाचा उपांत्य फेरीचा सामना झेकच्या मर्केटा व्होंड्रोसोव्हाशी होणार आहे. व्होंड्रोसोव्हाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ट्युनेशियाच्या जेबॉरचे आव्हान 6-4, 6-1 असे संपुष्टात आणले.
या स्पर्धेत चीनच्या वेंग झीनयुने एकेरीची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आठव्या मानांकित बेडोसाने दुखापतीमुळे दुसरे सेट अर्धवट सोडला. त्यामुळे झिनयुला पुढील फेरीत चाल मिळाली. वेंगने हा सामना 6-1 असा जिंकला. 23 वर्षीय वेंगने या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफला पराभूत केले होते.









