बोपण्णा-एबडन यांची दुहेरीत विजयी सलामी, मरे, क्विटोव्हा पराभूत
वृत्तसंस्था/ लंडन
अखिल इंग्लंड टेनिस क्लबच्या ग्रासकोर्टवर सुरू असलेल्या 2023 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अॅलकॅरेझ, सर्बियाचा द्वितीय मानांकित नोव्हॅक जोकोविच, ग्रीसचा सित्सिपस तर महिला विभागात बेलारुसची आर्यना साबालेन्का, ब्राझीलची हेदाद माईया, यांनी शानदार विजय नोंदवले. पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडन यांनी विजयी सलामी दिली. झेकच्या क्विटोव्हा तसेच ब्रिटनचा अँडी मरे, स्वीसचा वावरिंका यांचे आव्हान समाप्त झाले.

पुरुष एकेरीच्या सेंटर कोर्टवर झालेल्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात आतापर्यंत सातवेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवणाऱ्या सर्बियाच्या द्वितीय मानांकित जोकोविचने स्वीसच्या स्टॅनिसलास वावरिंकाचा जवळपास दोन तासांच्या कालावधीत 6-3, 6-1, 7-6(7-5) अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूमध्ये स्थान मिळवले. विम्बल्डन स्पर्धेतील जोकोविचचा हा सलग 31 वा विजय आहे. आता पुढील फेरीत जोकोविचची लढत पोलंडच्या हुबर्ट हुरकेझशी होणार आहे.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात ग्रीकच्या स्टिफॅनोस सित्सिपसने ब्रिटनच्या माजी टॉपसिडेड अँडी मरेचे आव्हान पाच सेट्समधील लढतीत संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली. सित्सिपसने हा सामना 7-6(7-3), 6-7(2-7), 4-6, 7-6(7-3), 6-4 असा जिंकला. या लढतीमध्ये सुरुवातीला 24 वर्षीय सित्सिपस पिछाडीवर होता पण त्यानंतर सित्सिपसने आपल्या सर्विसच्या जोरावर मरेचे आव्हान संपुष्टात आणले. 36 वर्षीय मरेने 2017 पासून या स्पर्धेत चौथी फेरी गाठलेली नाही. मरेने यापूर्वी दोनवेळा विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.
स्पेनच्या टॉप सिडेड कार्लोस अॅलकॅरेझने दुसऱ्या फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या अॅलेक्सझांडेर मुल्लेरचा 6-4, 7-6(7-2), 6-3 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. मुसळधार पावसामुळे येथे शुक्रवारी काही सामने अर्धवट स्थितीत थांबवावे लागले होते. अॅलकॅरेझने गेल्या वर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली असून त्याने गेल्या महिन्यात झालेल्या क्विन्स क्लब ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धा जिंकली होती.

पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडनने विजयी सलामी देताना अर्जेंटिनाच्या ड्युरेन व इचेवेरी यांचा 6-2, 6-7(5-7), 7-6(10-8) अशा सेट्समध्ये पराभव दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. हा सामना 2 तास 15 मिनिटे चालला होता. बोपण्णा आणि एबडन या जोडीचा दुसऱ्या फेरीतील सामना रविवारी ब्रिटनच्या फर्नेली आणि जोहानूस यांच्याबरोबर होणार आहे. बोपण्णा आणि एबडन यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात कतार टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात बेलारुसच्या द्वितीय मानांकित साबालेन्काने फ्रान्सच्या ग्रेचेव्हाचा 2-6, 7-5, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत साबालेन्काने पहिल्या फेरीतील सामन्यात हंगेरीच्या युदेव्हर्दीचा 6-3, 6-1 असा पराभव केला होता तर ग्रेचेव्हाने इटलीच्या जॉर्जीचा 6-2, 6-4 असा पराभव करून विजयी सलामी दिली होती.
बेलारुसच्या सेसनोव्हिचने दुसऱ्या फेरीतील सामन्यात झेकच्या माजी विजेत्या पेत्रा क्विटोव्हाला पराभवाचा धक्का देत तिसरी फेरी गाठली. सेसनोव्हिचने क्विटोव्हा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये सहज पराभव केला. 33 वर्षीय क्विटोव्हाने 2011 आणि 2014 साली वाम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. सेसनोव्हिचने दुसऱ्या फेरीतील हा विजय केवळ 74 मिनिटात नोंदवला. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात ब्राझीलच्या हेदाद माईयाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत पहिल्यांदाच विम्बल्डनची चौथी फेरी गाठली. शनिवारी झालेल्या या सामन्यात माईयाने रुमानियाच्या सोरेना सिरेस्टीचा 6-2, 6-2 असा पराभव केला. अलीकडेच झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत ब्राझीलच्या माईयाने उपांत्य फेरी गाठली होती. या कामगिरीनंतर तिने महिला टेनिसपटूंच्या मानांकनात पहिल्या 10 खेळाडूमध्ये स्थान मिळवले. अशी कामगिरी करणारी माईया ही ब्राझीलची पहिली महिला टेनिसपटू आहे.









