फ्रिट्झ, शेल्टन, लैला, बॉन्झीही विजयी, मेदवेदेव्ह, टॉसन पराभूत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने दुसरी फेरी गाठली तर रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. अलेक्झांड्रा इआला ही ग्रँडस्लॅममध्ये सामना जिंकणारी फिलिपिन्सची पहिली महिला टेनिसपटू बनली. याशिवाय आर्यना साबालेन्का, एम्मा राडुकानू, लैला फर्नांडेझ, मर्केटा व्होन्ड्रूसोव्हा, एलेना ओस्टापेन्को, टेलर फ्रिट्झ, बेन शेल्टन यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली. मेदवेदेव्हप्रमाणे व्हेरोनिका कुडरमेटोव्हा, क्लारा टॉसन यांनाही पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
विम्बल्डनमधील उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर पहिल्याच सामन्यात सामन्यात खेळणाऱ्या जोकोविचने लर्नर तिएनवर 6-1, 7-6 (7-3), 6-2 अशी मात केली. शारीरिक तक्रारीवर संघर्ष करीत त्याने या स्पर्धेतील एकूण्ण 80 वा विजय नोंदवला. ग्रँडस्लॅम स्पर्धा 1968 पासून व्यावसायिक झाल्यानंतर ग्रँडस्लॅमच्या पहिल्या फेरीत सलग 75 सामने जिंकणारा तो पहिला पहिला टेनिसपटू बनला आहे. त्यापैकी 55 सामने त्याने सरळ सेट्नी जिंकले आहेत. त्याची पुढील लढत अमेरिकेच्या झाचारी स्वाजदाशी होईल.
मेदवेदेव्ह पराभूत, फ्रिट्झ विजयी
अन्य एका सामन्यात 13 व्या मानांकित डॅनील मेदवेदेव्हला पहिल्याच सामन्यात स्पर्धेबाहेर पडावे लागले. 2021 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या मेदवेदेव्हला बेंजामिन बॉन्झीने पाच सेट्सच्या लढतीत हरविले. पहिले दोन सेट बॉन्झीने जिंकले होते. पण नंतरचे दोन सेट्स जिंकून मेदवेदेव्हने बरोबरी साधन सामना पाचव्या सेटवर नेला. पण अखेरीस बॉन्झीने हा सामना 6-3, 7-5, 6-7 (5-7), 0-6, 6-4 असा जिंकला. तिसऱ्या सेटच्या अखेरीस फोटोग्राफर कोर्टवर आल्याने सामना सहा मिनिटे थांबवावा लागला होता. त्यावेळी मेदवेदेव्ह पराभूत होण्याच्या मार्गावर होता. पण त्याने झुंजार पुनरागमन केले असले तरी त्याला शेवटी पराभूत व्हावे लागले. पुरुष एकेरीतील अन्य सामन्यांत चौथ्या मानांकित टेलर फ्रिट्झने आपल्याच देशाच्या एमिलिओ नाव्हाचा 7-5, 6-2, 6-3 असा पराभव केला तर सहाव्या मानांकित बेन शेल्टनने दुसरी फेरी गाठताना पेरूच्या पात्रता फेरीतून आलेल्या इग्नेशिओ बुसवर 6-3, 6-2, 6-4 अशी मात केली.
साबालेन्का, राडुकानू विजयी
महिला एकेरीत विद्यमान विजेत्या साबालेन्काने दुसरी फेरी गाठताना स्वित्झर्लंडच्या रेबेका मासारोव्हाचा 7-5, 6-1 असा पराभव केला. ब्रिटनच्या राडुकानूने चार वर्षापूर्वी ही स्पर्धा जिंकली तेव्हा पात्रता फेरीतून आलेली व स्पर्धा जिंकणारी पहिली खेळाडू बनली होती. तिने दुसरी फेरी गाठताना जपानच्या पात्रता फेरीतून आलेल्या इना शिबाहाराचा 6-1, 6-2 असा फडशा पाडला. कॅनडाच्या लैला फर्नांडेझनेही आपल्याच देशाच्या रेबेका मारिनोवर 6-2, 6-1 अशी सहज मात केली तर विम्बल्डन चॅम्पियन मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाने ओक्साना सेलेखमेटेव्हावर 6-3, 7-6 (7-3) अशी मात केली. माजी प्रेंच विजेती एलेना ओस्टापेन्कोने चीनच्यावर वांग झियूचा 6-4, 6-3, जेनिस त्जेनने इंडोनेशियासाठी 22 वर्षांत पहिला ग्रँडस्लॅम विजय मिळवून देताना 24 व्या मानांकित व्होरोनिका कुडरमेटोव्हाला 6-4, 4-6, 6-4 असा पराभवाचा धक्का दिला.
इआलाचा टॉसनला धक्का
फिलिपिन्सच्या 20 वर्षीय अलेक्झांड्रा इआलाने चुरशीच्या लढतीत 14 व्या मानांकित डेन्मार्कच्या क्लारा टॉसनचे आव्हान 6-3, 2-6, 7-6 (13-11) असे संपुष्टात आणले. टॉप 20 मधील खेळाडूला पराभूत करण्याची तिची ही चौथी वेळ आहे. याआधी तिने मियामी ओपन स्पर्धेत इगा स्वायटेकलाही पराभवाचा धक्का दिला होता.
अन्य सामन्यात बेलिंडा बेन्सिकने एस. झँगचा 6-3, 6-3, पोटापोव्हाने एल. झु हिचा 6-4, 4-6, 6-2, चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाने एम. शेरिफचा 6-0, 6-4, व्हिक्टोरिया अझारेन्काने एच. इनोउचा 7-6 (7-0), 6-4 असा पराभव केला तर सातवी मानांकित जस्मिन पाओलिनी व ब्लिन्कोव्हा यांनीही विजय मिळविले.









