वृत्तसंस्था/ फोर्ट वर्थ (टेक्सास)
येथे सुरू असलेल्या 2022 च्या डब्ल्यूटीए महिलांच्या फायनल्स टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या आर्यना साबालेन्काने पोलंडच्या इगा स्वायटेकचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता साबालेन्का आणि कॅरोलिन गार्सिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी झालेल्या सामन्यात साबालेन्काने टॉप सीडेड स्वायटेकचा 6-2, 2-6, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव केला. दुसऱया एका सामन्यात फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने ग्रीकच्या मारिया सॅकेरीचे आव्हान 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये 75 मिनिटांच्या कालावधीत संपुष्टात आणले. या सामन्यात गार्सियाने 19 विजयी फटके तसेच 6 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. या लढतीमध्ये गार्सियाने पहिल्या सेटमधील पहिले सलग चार गेम्स जिंकले. तीन महिन्यांपूर्वी सिनसिनॅटी येथे झालेल्या स्पर्धेत गार्सियाला सॅकेरीचा पराभव करण्यासाठी तीन सेट्समध्ये लढत द्यावी लागली होती.









