वृत्तसंस्था/ माँट्रियल
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या कॅनेडियन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तृतीय मानांकित इलिना रिबाकिना तसेच पोलंडची इगा स्वायटेक यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या एकेरीच्या सामन्यात रिबाकिनाने स्लोनी स्टिफेन्सचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. रिबाकिनाने पहिल्यांदाच या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 2022 मधील विम्बल्डन विजेती रिबाकिना हिला स्टिफेन्सचा पराभव करण्यासाठी 75 मिनिटे झगडावे लागले. स्टिफेन्सने 2017 साली अमेरिका ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.
दुसऱ्या एका सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने कॅरोलिना मुचोव्हाचा 6-1, 4-6, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. पावसाच्या अडथळ्यामुळे हा सामना दोनवेळा थांबवावा लागला होता. त्याचप्रमाणे या स्पर्धेत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवताना जस्मीन पावोलिनीचा 6-4, 6-0 असा फडशा पाडला. अमेरिकेच्या कोको गॉफने विम्बल्डन विजेती व्होड्रोसोव्हाचा केवळ 62 मिनिटात 6-3, 6-0 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. डेरिया कॅसेटकिनाने झेकच्या बोझकोवाचा 6-3, 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत प्रवेश केला.









