अँडी मरे, ऑन्स जेबॉर यांचेही विजय, पावसाच्या व्यत्ययामुळे अनेक सामने लांबणीवर
वृत्तसंस्था/ लंडन
अग्रमानांकित कार्लोस अल्कारेझने विम्बल्डन मोहिमेची सुरुवात विजयाने केली असून त्याने जेरेमी चार्डीचा पराभव केला तर ब्रिटनच्या अँडी मरेनेही विजय मिळवित दुसरी फेरी गाठली आहे. महिला एकेरीत विद्यमान विजेती इलेना रायबाकिना, द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्का, ट्युनिशियाची ऑन्स जेबॉर यांनीही विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली आहे.
अल्कारेझने फ्रान्सच्या 36 वर्षीय चार्डीवर 6-0, 6-2, 7-5 अशी मात केली. अल्कारेझने मागील वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले असून दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. त्याच्या वेगवान खेळासमोर चार्डीचा टिकाव लागला नाही. अल्कारेझने येथील स्पर्धेचे जेतेपद मिळविले तर मानांकनात तो अग्रस्थानी कायम राहील. चार्डीने आजवर टूर लेव्हलवर फक्त एकच स्पर्धा जिंकली असून 2009 मध्ये त्याने स्टुटगार्ट स्पर्धा जिंकली होती. दुहेरीत मात्र त्याने टूरवरील सात अजिंक्यपदे मिळविली आहेत.
ब्रिटनच्या अँडी मरेने विजयी प्रारंभ करताना आपल्याच देशाच्या रेयान पेनिस्टनचा 6-3, 6-0, 6-1 असा पराभव केला. मरेने ही स्पर्धा यापूर्वी दोनदा जिंकली आहे. दोन तास चाललेल्या या लढतीत त्याने व्यवस्थित हालचाली केल्या.
जेबॉर, रायबाकिना, साबालेन्काचे विजय
महिला एकेरीत मागील वर्षीची उपवेजेती ट्युनिशियाच्या ऑन्स जेबॉरने पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना पोलंडच्या बिगरमानांकित मॅग्डालेना फ्रेचचा 6-3, 6-3 असा धुव्वा उडविला. जेबॉरला येथे सहावे मानांकन मिळाले आहे. विद्यमान विजेत्या कझाकच्या इलेना रायबाकिनाने जेतेपद स्वत:कडेच राखण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना स्वित्झर्लंडच्या शेल्बी रॉजर्सचा पावणेदोन तासाच्या लढतीत 4-6, 6-1, 6-2 असा पराभव केला. 49 वे मानांकन असलेली रॉजर्स अपसेट विजय नोंदवण्यासाठी ओळखली जाते. तिने आजवर टॉप 10 मधील सात जणींना पराभवाचे धक्के दिले आहेत. त्यातील तीन विजय ग्रँडस्लॅममधील आहेत. तिने रायबाकिनालाही याआधी हरविले आहे. या दोघींत आतापर्यंत पाच लढती झाल्या असून त्यातील दोन रॉजर्सने जिंकल्या आहेत. द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्काने हंगेरीच्या पन्ना उद्वार्डीचा 6-3, 6-1 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली.
पावसाचा व्यत्यय
पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मंगळवारी केवळ तीन सामने पूर्ण होऊ शकले तर पुरुष एकेरीचे 34 सामने रद्द करावे लागले. काही सामने सुरू झाले होते, ते अर्धवट स्थितीत थांबवण्यात आले होते. या लढतीत डॉमिनिक थिएम व सित्सिपस (6-3, 3-4), मॅटेव बेरेटिनी व लॉरेन्झो सोनेगो (6-7 (5-7)) यांचा समावेश आहे. अर्धवट राहिलेल्या व रद्द झालेल्या लढती बुधवारी खेळविल्या जात आहेत.