ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस : डिमिट्रोव्हचीही विजयी सलामी, सोफिया केनिन पहिल्याच फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत मंगळवारी जागतिक तिसऱ्या मानांकित इलेना रायबाकिनाने दुसरी फेरी गाठली. त्याचप्रमाणे ब्रिटनची एम्मा रॅडुकानू, जागतिक अग्रमानांकित पोलंडची इगा स्वायटेक, 13 वा मानांकित बल्गेरियाचा ग्रिगोर डिमिट्रोव्ह यांनीही या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली तर माजी चॅम्पियन सोफिया केनिनचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
झेकच्या रायबाकिनाने संथ सुरुवातीवर मात करीत मागील वर्षीची उपविजेती कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे कडवे आव्हान 7-6 (8-6), 6-4 असे संपुष्टात आणत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. तिची पुढील लढत रशियाच्या बिगरमानांकित अॅना ब्लिन्कोव्हाशी होणार आहे. अन्य एका सामन्यात ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूने अमेरिकेच्या अनुभवी शेल्बी रॉजर्सचा 6-3, 6-2 असा पराभव केला. घोट्याच्या व मनगटाच्या दुखापतीमुळे रॅडुकानू सुमारे आठ महिने टेनिसपासून दूर राहिली होती. चीनच्या बिगरमानांकित वांग यफानशी तिची पुढील लढत होईल.
जागतिक अग्रमानांकित इगा स्वायटेकला पहिल्याच सामन्यात माजी विजेत्या सोफिया केनिनकडून कडवा प्रतिकार झाला. पण अखेर तिने ही लढत 7-6 (7-2) अशी जिंकत दुसरी फेरी गाठली. दोघींकडून दर्जेदार टेनिसचे प्रदर्शन घडले. 2020 मध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत या दोघींची गाठ पडली होती. केनिनने चार वर्षापूर्वी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. स्वायटेकने सलग सहाव्यांदा या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली असून तिची पुढील लढत माजी चॅम्पियन अँजेलिक केर्बर किंवा डॅनियली कॉलिन्स यापैकी एकीशी होईल.
पुरुष एकेरीत बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने मार्टन फुक्सोविक्सचा चार सेट्सच्या लढतीत 4-6, 6-3, 7-6 (7-1), 6-2 असा पराभव केला. डिमिट्रोव्हला येथे 13 वे मानांकन मिळाले आहे. दुसऱ्या फेरीत सेबॅस्टियन ऑफनर किंवा थानासी कोकिनाकिस यापैकी एकाशी होईल.









