वृत्तसंस्था / सिनसिनॅटी (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी मास्टर्स 1000 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या गटात इलिना रायबाकीना, मॅडीसन किज आणि आर्यना साबालेंका यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. पुरुषांच्या विभागात इटलीच्या टॉपसिडेड आणि विद्यमान विजेत्या जेनिक सिनेरने आपली विजयी घोडदौड कायम राखताना चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात दहाव्या मानांकीत इलिना रायबाकीनाने प्रतिस्पर्ध्यावर 4-6, 6-3, 7-5 अशा सेट्समध्ये मात करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱ्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम विजेती मॅडीसन किजने इटोचा 6-4, 6-3 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेती टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने इमा राडुकेनुचा 7-6 (7-3), 4-6, 7-6 (7-5) असा पराभव केला. हा सामना तीन तास चालला होता. या सामन्यात साबालेंकाने 46 विजयी फटके नोंदविले असून तिचा पुढील फेरीतील सामना जेसीका मॅनेरियोशी होणार आहे.
पुरुषांच्या विभागातील तिसऱ्या फेरीत झालेल्या सामन्यात इटलीच्या सिनेरने गॅब्रीयल डायलोचा 6-2, 7-6 (8-6) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत चौथी फेरी गाठली. विद्युत प्रवाहामध्ये खंड पडल्याने हा सामना दीड तास उशीरा खेळविण्यात आला.









