वृत्तसंस्था/बेंगळूर
2025 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू झालेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी ऋतुराज गायकवाडच्या दमदार शतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने पहिल्या डावात 6 बाद 363 धावा जमविल्या. प. विभाग आणि मध्यविभाग यांच्यात हा सामना खेळविला जात आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना पश्चिम विभागाच्या डावात ऋतुराज गायकवाडचे दमदार शतक संघाला सावरले. यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर हे दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ऋतुराजने संघाला सुस्थितीत नेले. गायकवाडने 206 चेंडूत 184 धावा झोडपल्या. तनुष कोटीयन व शार्दुल ठाकुर हे अनुक्रमे 65 आणि 24 धावांवर दिवसअखेर खेळत होते. या हंगामातील ऋतुराजचे हे सलग दुसरे शतक आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या बुचीबाबू क्रिकेट स्पर्धेत ऋतुराजने हिमाचल प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राकडून खेळताना 133 धावा झळकविल्या. गायकवाड मैदानात येण्यापूर्वी पश्चिम विभागाची स्थिती 2 बाद 10 अशी केविलवाणी होती. जैस्वाल 4 धावांवर तर हार्विक देसाई 1 धावेवर बाद झाले. 28 वर्षीय गायकवाडने 85 चेंडूत आपले अर्धशतक तर शतक 131 चेंडूत झळकविले. ऋतुराजच्या या खेळीमध्ये 15 चौकारांचा समावेश आहे. आर्याने 39 धावांचे योगदान दिले. श्रेयस अय्यर 25 धावांवर तर मुलानी 18 धावांवर बाद झाले. त्यावेळी पश्चिम विभागाची स्थिती 5 बाद 179 अशी होती. ऋतुराजने आपले दीड शतक 178 चेंडूत पूर्ण केले. ऋतुराज गायकवाड जैनच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला.
संक्षिप्त धावफलक : पश्चिम विभाग 6 बाद 363 (ऋतुराज गायकवाड 184, आर्या 39, श्रेयस अय्यर 25, मुलानी 18, जैस्वाल 4, देसाई 1, कोटियन खेळत आहे 65, शार्दुल ठाकुर खेळत आहे 24)









