वाळवणं करून संपलेली असतात, वाळय़ाचे पडदे पाणी पिऊन पिऊन कंटाळलेले असतात. आंब्याचा मोसम बघता बघता संपून जातो. मोगऱयाचा बहर आटोपशीर सैलावतो. उन्हाच्या तापत्या झळा आणि पाणवठय़ावरचं पाणी एकमेकांशी समगती राखत व्यस्त दिशेने चाललेलं असतं. बहुतेक सगळी उन्हाळी कामंही आवरलेली असतातच. आता फक्त वाट पाहणं चालू असतं. खेडय़ातल्या लोकांची शेतीची पावसाळय़ाआधीची कामं इतकी जोरदार सुरू असतात की इकडे तिकडे बघायला बिचाऱया शेतकऱयाला वेळच नसतो. ज्या सृजनाच्या सोहळय़ावर भाळून सगळे कलाकार तो गाण्यातून वादनातून रंगांमधून दाखवत असतात त्या सोहळय़ाचा जनक मात्र चिखलामातीत राबत असतो. आणि आता सुरू असतं आभाळाकडे पाहत राहणं…कुठे काळा ढग दिसतो का रे देवा…. माडगूळकर काय लिहून गेले आहेत त्या ओळी…. सिद्धहस्त गीतकार म्हणतात त्यांना ते उगीच नाही.
आसुसली माती, पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ती, आता पाऊस पाड गा
पाऊस पाड..
अशी शेतकऱयांची अवस्था असते. व्याकूळ झालेल्या चातकाप्रमाणे! आणि मग हवेतला उष्मा वाढतच जातो. ‘तापत्या झळा उन्हाच्या’ सहन होतच नसतात. रात्री उघडलेल्या प्रेंच विंडोमधून येणारा हलका नैसर्गिक वारा कृत्रिम हवेवर मात करून जातो. थंडावा देणाऱया वातावरणात मंद आवाजात आशा भोसलेंची गीतं लहरत जातात.
ये रे घना ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना
टाकुनिया घरदार नाचणार नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना
कंटाळून गेलेला, उन्हाने उललेला जीव हवा होऊन जातो. ‘नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू, बोलावतो सोसाटय़ाचा वारा मला रसपाना’ या ओळी आणि आशाताईंचा लिफ्ट करून नेणारा सूर…किती अचूक पंक्ती आणि अचूक स्वर…बासरी हे सुषिरवाद्य. त्यातून वाहणारा नियंत्रित वायू आणि बाहेर असणारा सोसाटय़ाचा वारा यांचं एकत्र येणं आणि पुन्हा त्या वाद्याचे सूर येताना वाऱयावर स्वार होऊनच येणं ही कल्पना आरती प्रभुच मांडू जाणोत! घनाची आळवणी सुरूच असते. आणि थोडेसे शुष्क उसासे… कुणीतरी हवं होतं साथीला. तापलेलं अंतर शीतळ करायला. जखमी झालेल्या मनावर इवली फुंकर घालायला. सूर वाहून चाललेले असतात. गळा गातच असतो. रात्री विरता तानपुरा जुळवला जातो आणि विद्ध पक्षी गात रहातो! वेदनांचं गाणं.
पाऊस हवा हवासा झालेला असतो आता. एखाद्या चिरविरही प्रियकराला आपल्या प्रेयसीला भेटण्याची जितकी तहान असते तितकीच तहान आता लागलेली असते. आणि मग एखादी संध्याकाळ भलतीच वेगळी उगवते. इतके दिवस रणरण करणाऱया सूर्यमहाराजांचा नक्षा उतरतो.
क्षितिजी आले भरते गं घनात कुंकुम खिरते गं
झाले अंबर झुलते झुंबर, हवेत अत्तर तरते गं!
असं आकाशाचं एकाएकी आभाळ होऊन जातं. आता जिवाची काहिली सर्वोच्च पातळीवर असते. वातावरण थंड होत असतं कुठून तरी मृद्गंध जोरदार दरवळत येतो. हेच ते ‘हवेत अत्तर तरते गं’ कारण ते नुसतं दरवळणं नव्हे तर तरंगणं असतं. त्यात तरलता असते ना! झुंबर झुलावं तसे काळे ढग झुलत असतात. खरं तर पाऊस आणि बोरकर हे अद्वैत आहे. कारण
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
चंचलतनु चपलचरण अनिलगण निघाले पासून ते थेट
‘समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना’ पर्यंत पावसाचे असंख्य प्रकार गाणी होऊन बरसले आहेत त्यांच्या लेखणीतून. पहिला पाऊस हा पहिल्या प्रेमातल्या विशेषतः ‘त्याच्या’ जवळिकीइतकाच उतावळा आणि धुंवाधार असतो. अस्तित्त्व घमघम सुगंधी करायची त्याला फार घाई असते. गावभर डंका पिटणारा तो विजेचा कडकडाट, टपटप सरसर धोधो करत येणारी मुसळधार आणि त्याचबरोबर आवडीने लावली जाणारी मल्हार रागाच्या असंख्य प्रकारातली गाणी आणि सृष्टीला स्नान घालणारी ती अखंड धून हे खूप खूप अपूर्वाईचं असतं. दुर्गा रागामधल्या सर्वप्रिय ‘सखि मोरी रुमझुम’ च्या अंतऱयात त्या विजेचं भारी सुरेख स्वरचित्र काढलेलं आहे.
‘नभ मेघांनी आक्रमिले तारांगण सर्व व्यापुनि गेले’ हे एक असंच गाणं. आद्य संगीत नाटक ‘संगीत सौभद्र’ मधलं लोकप्रिय नाटय़गीत. गौड मल्हार त्या पहिल्या पावसासारखाच अंगावर कोसळत रहातो. पण म्हणाल तर ते कोसळणंही जरा अलवारसं वाटतं कारण पं. कारेकरांचा तसा स्वर. पण या पावसानं खरंच मनाची तहान भागते? नाहीच ना! कारण प्रेंच विंडोबाहेर आता विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट दिसत असतो पण ते थेंब काही आत येणं शक्मय नसतं. नुसतेच दिसतात पण स्पर्श करता येत नाही. आणि मग एखाद्या षोडशा गुड्डीचं असं होतं
बोले रे पपीहरा, पपीहरा, नित घन बरसे नित मन प्यासा, नित मन प्यासा नित घन बरसे रे।़।़
गाण्यातून पाऊस अगदी सुरागणिक स्पष्टपणे दिसणे म्हणजे काय ते या गाण्यातून कळतं. पावसाच्या पाण्याइतक्मयाच नितळ आवाजात वाणी जयराम यांनी ते गायलं आहे. दर गाण्यागणिक पाऊस असा कवळायला जवळ जवळ येत जातो आणि अनावर झालेली खिडक्मया दारं सताड उघडतात. आणि ‘थेंब होऊनी मुठीत येतील आभाळातील तारे’ असं होतं. मग सुरू होतं भिजणं आणि रुजणं. पाऊस आणि तिची त्याची गाणी म्हणजे तर आहाहा!
‘घन ओथंबून येती वनात राघू घिरती
डोंगरलाटा वेढित वाटा ओढित मजला येती’ मधल्या शेवटच्या ओळीतली मूर्तिमंत लज्जा सुरांतून ऐकायची असेल तर ते गाणं पूर्ण ऐकलंच पाहिजे.
‘घन ओथंबून आले पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला साजण छैलछबीला
घन होऊन बिलगला’ या मोजून दोन ओळींमध्ये लतादीदींनी अख्खी नवी लाजमोगरी कोवळी पोर जिवंत केलीय. असे ठोके थांबतात ना काळजाचे…ऐका म्हणजे कळेल. पावसात नटय़ांना भिजवणे हा फिल्मी मंडळींचा आवडता छंद आहे. एखाद्या विनोदी चित्रपटातलं शृंगारिक गीत त्यामुळेच वेगळं लक्षात राहतं. उदाहरणार्थ मधु कांबीकर वर चित्रित झालेलं
झुंजुर मुंजुर पाउसमाऱयानं अंग माझं ओलंचिंब झालं रं, टिपुर टिपुर पाण्याची घुंगरं हिरव्या हिरव्या धरेवरी आली रं, बेगीन ये साजणा
आधीच पावसात भिजलेलीची मादक अदा त्यात वर आशाताईंचा मादक स्वर…काय
सांगावं?
विरही खिडकीचा विरह एव्हाना संपलेला असतो. बाहेर यथेच्छ पाऊस कोसळत असतो. बेडवर पडल्या पडल्या ते थेंब काचेवरून ओघळताना मोठे सुरेख दिसत असतात. उबदार पांघरुणातली त्याहून उबदार मिठी मग आणखीनच घट्ट झालेली असते. रात्री उशिरा कधीतरी पाऊस उघडतो. चुकार ओलं चांदणं पडतं. त्यांचं पाऊस गाणं आता चांदणगाणं होतं.
पाऊस पडून गेल्यावर
मी चंद्र चिंब भिजलेला
विझवून चांदण्या साऱया,
विझलेला, शांत निजलेला.
-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू








