पुतीन यांनी केले सैन्याचे कौतुक : युक्रेनच्या अध्यक्षांनी दिली पुष्टी
► वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनच्या बखमुत शहरावर कब्जा केल्याचा दावा रशियातील प्रायव्हेट आर्मी वॅगनर ग्रूपने केला आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी बखमुत शहरावरील कब्जाकरता सैन्याचे कौतुक केले आहे. तर बखमुतमध्ये आता काहीच शिल्लक राहिले नाही, शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी काढले आहेत.
यापूर्वी 20 मे रोजी वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत बखमुतवर कब्जा केल्याचा दावा केला होता, परंतु तेव्हा युक्रेनने हा दावा फेटाळला होता. ऑगस्ट 2022 पासून या शहरात रशिया आणि युक्रेनच्या सैन्यादरम्यान लढाई सुरू होती, मागील 3 महिन्यांपासून याची तीव्रता वाढली होती.
रशियाच्या सैन्याने युक्रेनवर 24 फेब्रुवारी 2022 रोजी आक्रमण केले होते. युक्रेनवर कब्जा करणे हा यामागील पुतीन यांचा उद्देश होता. परंतु रशियाला अद्याप युक्रेनवर पूर्ण कब्जा करणे शक्य झालेले नाही. याचमुळे 452 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पायाभूत सुविधा आणि सैन्य उपकरणे नष्ट झाली आहेत. या युद्धात दोन्ही देशांचे हजारो सैनिक मारले गेल्याचे मानले जाते.
युक्रेनच्या 7 शहरांवर रशियाचा कब्जा
रशियाने काळ्या समुद्राच्या व्यापारी मार्गावरील बहुतांश हिस्स्यावर कब्जा केला आहे. याचबरोबर युद्धाच्या प्रारंभापासून आतापर्यंत रशियाने युक्रेनच्या 18 टक्के भूभागावर नियंत्रण मिळविले आहे. या भूभागात युक्रेनची 6 मोठी शहरे सेवेराडोनेट्स्क, डोनेट्स्क, लुहान्स्क, जपोरिजिया, मारियुपोल आणि मेलिटोपोल वसलेली आहेत. ही शहरे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत होती. तर बखमुत हे रशियाने कब्जा केलेले 7 वे शहर ठरले आहे.
कब्जामागील कारण
युद्धात युक्रेन प्रदीर्घकाळ तग धरून राहण्यामागे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून मिळणारे शस्त्रास्त्र अन् आर्थिक समर्थन आहे. दुसरीकडे रशिया युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून मिळत असलेल्या समर्थनाला विरोध करत आहे. युक्रेनच्या 7 शहरांवर कब्जा करून रशिया आता आपल्याला रोखणे अशक्य असल्याचा संदेश पाश्चिमात्य देशांना देऊ पाहत आहे. 2014 मध्ये रशियाने अशाचप्रकारे क्रीमियावर कब्जा केला होता, या कब्जाला पाश्चिमात्य देशांनी विरोध केला होता. तरीही क्रीमिया अद्याप रशियाच्या नियंत्रणाखाली आहे.
प्रथम कब्ज अन् मग माघार
युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाने कब्जा केला होता, परंतु नंतर येथून रशियाला माघार घ्यावी लागली होती. 15 दिवसांत युद्धात विजय मिळविण्याचा दावा करणाऱ्या रशियाने हल्ल्याच्या एक महिन्यानंतरच युक्रेनची राजधानी कीव्हमधून सैन्य माघारीचे आदेश दिले होते. रशियाने इजुमवर मागील वर्षाच्या मार्च महिन्यात कब्जा केला होता. परंतु सप्टेंबरमध्ये युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या तावडीतून इजुमची मुक्तता करविली होती. खेरसॉनवर युद्धाच्या 5 दिवसांतच रशियाने कब्जा केला होता. परंतु 7 महिन्यांनी रशियाला येथून माघार घ्यावी लागली होती.









