15 ठार, युरोपियन महासंघाची इमारत नष्ट
वृत्तसंस्था/मॉस्को
रशियाने युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा उपयोग करण्यात आला आहे. या हल्ल्यात युव्रेनची राजधानी कीव्हमध्ये असणारी युरोपियन महासंघाची एक इमारत नष्ट झाली आहे. त्यामुळे हे युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युरोपियन महासंघाच्या अधिकाऱ्यांनी रशियावर कठोर टीका केली असून तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही आठवड्यांमधला हा सर्वात तीव्र हल्ला असल्याचे मानले जाते. या हल्ल्यासाठी रशियाने 629 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा उपयोग केला आहे. युव्रेनच्या 20 स्थानांना यात लक्ष्य करण्यात आले असून त्या देशाची मोठी हानी झाली आहे. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती दिली गेली.
जखमींची संख्याही मोठी
रशियाच्या या नव्या हल्ल्यात किमान 45 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. तथापि, कीव्ह येथे आता फारशी रुग्णालयेही सुस्थितीत राहिलेली नाहीत. नव्या हल्ल्यात अनेक इमारती पडल्या असून त्यांच्या ढिगाऱ्यांखाली अनेक लोक अडकलेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती युरोपियन महासंघाने व्यक्त केली.
आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा उपयोग ?
युव्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून रशियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा उपयोग केल्याचा आरोप केला. असे करुन रशिया आंतरराष्ट्रीय नियमांचा सरसकट भंग करीत आहे, अशी टीका त्यांनी केली. रशियाला हे युद्ध थांबावे, असे वाटत नाही. तसेच समस्या शांततेच्या मार्गाने आणि बोलणी करुन सोडविण्याची रशियाची इच्छा नाही, हे या हल्ल्यावरुन स्पष्ट होते. आता युरोपियन देशांनी आपले धोरण निर्धारित करण्याची वेळ आली आहे, असा इशाराही त्यांनी दिला असून अन्य देशांशी बोलणी केली जातील आणि युक्रेनचा प्रतिसाद कसा असेल हे ठरविले जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले.
युरोपियन नेत्यांचा संताप
या हल्ल्यात युरोपियन महासंघाची मोठी हानी झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर प्रथमच युरोपियन महासंघाच्या इमारतीवर हल्ला करण्यात आला आहे. यावरुन रशिया अधिकाधिक आक्रमक होत आहे, हे दिसून येते. केवळ युक्रेन नव्हे, तर युरोपातील अनेक देशांसमोरही आता सुरक्षेची समस्या उभी राहिली आहे. हे युद्ध त्वरित थांबले नाही, तर ते किती प्रमाणात चिघळेल, याचे अनुमान काढता येणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया अनेक युरोपियन देशांनी व्यक्त केली. युव्रेनसंबंधी आता रशियाला कोणतीही सहानुभूमी उरलेली नाही. रशिया निर्दयपणे महिला, मुले आणि निरपराध्यांच्या हत्या करीत आहे, अशी टीका युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सेला व्हॉन डर लियेन यांनी केली. पुढच्या धोरणासंबंधी विचार करण्यासाठी लवकरच युरोपियन महासंघाची बैठक होण्याची शक्यता सूचीत करण्यात आली असून रशियाला निर्वाणीचा इशारा देण्यात येण्याची शक्यता अनेक युरोपियन नेत्यांनी गुरुवारी व्यक्त केली आहे
अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष
रशियाने हल्ले थांबविले नाहीत, तर युक्रेनने प्रतिहल्ला करावा, अशी सूचना काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. युव्रेनला शस्त्रेही पुरविण्यात येतील, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचीत केले होते. त्यामुळे रशियाच्या या नव्या हल्ल्यानंतर अमेरिकेची भूमिका काय असेल, यावर लक्ष ठेवले जात आहे. ऑगस्टमध्ये दोन ते तीन आठवडे रशियाच्या हल्ल्यांची तीव्रता कमी झाली होती. तथापि, आता अचानक रशियाने आपले धोरण आक्रमक केल्याने परिस्थिती कोणते वळण घेईल हे अनिश्चित झाले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.









