कीव शहरावर डागले 800 हून अधिक ड्रोन : पहिल्यांदाच सरकारी मुख्यालय लक्ष्य
वृत्तसंस्था/ कीव
रशियाने युक्रेनची राजधानी कीव शहरावर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ले केले. रशियाने युक्रेन सरकारच्या मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर मुख्यालयाला आग लागली आहे. रशियाने रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात नवजातासह तीन जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले आहेत.
युद्धादरम्यान पहिल्यांदाच युक्रेन सरकारच्या मुख्य इमारतीला नुकसान झाले आहे. रशियाने रात्रभर 805 ड्रोन्स आणि 13 क्षेपणास्त्रs डागली आहेत. ड्रोन हल्ल्यात नवजात आणि युवतीचा मृत्यू झाला. तर गरोदर महिलेसह 5 जण रुग्ण जखमी झाले. तर डार्नित्स्की जिल्ह्यात एका शेल्टरमध्ये हल्ल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला अशी माहिती युक्रेनच्या पंतप्रधान यूलिया स्विरीडेंको यांनी दिली.
नागरी वस्तींचे प्रचंड नुकसान
डार्नित्स्कीमध्ये नागरी इमारतीने हल्ल्यानंतर पेट घेतला होता. कीवच्या स्वियातोशिन्स्की जिल्ह्यात 9 मजली इमारतीच्या अनेक मजल्यांचे नुकसान झाले आहे. ड्रोन हल्ल्यामुळे एका 16 मजली इमारतीला आणि 2 नऊ मजली इमारतीला आग लागली. रशिया जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.
वीजपुरवठा ठप्प
व्रेमेनचुक शहरात अनेक स्फोट झाल्याने अनेक भागांमधील वीजपुरवठा ठप्प झाल्याची माहिती महापौर विटाली मालेत्स्की यांनी दिली. कीव शहरातील परिवहन आणि शहरी पायाभूत सुविधांना रशियाने हवाई हल्ल्याद्वारे लक्ष्य केले आहे.
रशियावर प्रत्युत्तरादाखल हल्ला
प्रत्युत्तरादाखल युक्रेनने रशियाच्या तेल पाइपलाइनला लक्ष्य केले. रशियाच्या ब्रायंस्क येथील द्रुजबा ऑइल पाइपलाइनवर हल्ला करण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या ड्रोन फोर्सचे कमांडर रॉबर्ट ब्रोवडी यांनी दिली. या हल्ल्यामुळे हंगेरी आणि स्लोवाकियाला होणारा रशियाचा तेलपुरवठा प्रभावित झाला आहे.









