कीव्हमध्ये पुन्हा आढळली सामूहिक दफनभूमी ः 900 मृतदेह दफन
कीव्ह क्षेत्रात 900 मृतदेहांसह आणखीन एका सामूहिक दफनभूमीचा शोध लावण्यात आल्याची घोषणा युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी केली आहे. पोलंडच्या प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत झेलेंस्की यांनी मार्च महिन्यात रशियाच्या सैन्याने ज्या क्षेत्रात कब्जा केला होता, तेथेच ही सामूहिक दफनभूमी आढळून आल्याचे म्हणत नेमके किती लोक मारले गेले आहेत हे कुणीच जाणत नसल्याचे नमूद केले आहे.
प्रथम तपास होईल, निष्कर्ष निघतील, मग एक जनगणना होणार आहे. आम्हाला या सर्व लोकांना शोधायचे आहे, परंतु हे किती लोक आहेत हेच आम्ही जाणत नाही. युक्रेनचे तपास अधिकारी युक्रेनच्या नागरिकांच्या विरोधात गुन्हे केलेल्या सर्व रशियन सैनिकांना शोधून काढत त्यांच्या विरोधात खटला चालवतील असे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
याचदरम्यान बूचामध्ये युक्रेनच्या नागरिकांचा छळ करून त्यांना ठार करणाऱया 10 रशियन सैनिकांची ओळख तपास यंत्रणेने पटविली आहे. रशियाच्या सैन्याकडून ठार करण्यात आलेल्या 412 नागरिकांचे मृतदेह शहरापासून सुमारे 31 किलोमीटर अंतरावर सामूहिक दफनभूमी आढळून आले होते. तपासकर्त्यांना आतापर्यंत कीव्ह क्षेत्रात सामूहिक दफनभूमींमध्ये सुमारे 1100 मृतदेह मिळाले असल्याची माहिती बूचाच्या महापौर अनातोली फेडोरुक यांनी दिली आहे. मारियुपोल शहराच्या बाहेरील भागात 3 सामूहक दफनभूमी मिळाल्या असून यात हजारो नागरिकांचे मृतदेह आहेत.









