वृत्तसंस्था/ किव
रशियाने युक्रेनवर हल्ले करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. क्षेपणास्त्रे आणि विमाने यांच्या माध्यमातून हे हल्ले सुरू आहेत. युक्रेनची राजधानी किव शहरावर रशियाने गेल्या आठवडय़ाभरात अनेक वायु हल्ले चढविले असून युक्रेनच्या सैनिकांनी कडवा प्रतिकार चालविला आहे. हल्ले होत असतानाही सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विशेष दलाकडून केला जात आहे.
युक्रेनमधील वीज निर्मिती केंद्रे बंद करण्याचा प्रयत्न रशियाचे सैनिक करत आहेत. युक्रेनमधील अनेक वीज केंद्रांमध्ये रशियन साधन सामुग्री आहे. ती तेथून काढून नेण्याचा आणि वीज निर्मिती थांबवण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जात आहे. हिवाळय़ामध्ये युक्रेनच्या नागरिकांना घरातील वातावरण गरम ठेवण्यासाठी विजेची अत्याधिक आवश्यकता असते. याच कालावधीत वीज बंद करून नागरिकांकडून प्रशासनावर दबाव येईल आणि त्यामुळे प्रशासन रशियासमोर शरणागती पत्करेल, अशी रशियाची समजूत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तोडण्याची योजना रशियाने आखली आहे.
युद्ध झाले दहा महिन्यांचे
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता दहा महिने पूर्ण होत आले आहेत. तथापि ते थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. रशियाने हे युद्ध हा प्रतिष्ठेचा विषय केला असून त्यामुळेच युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नात अडथळे येत असल्याचे आंतराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. युक्रेनने अनपेक्षितरित्या आतापर्यंत मोठा प्रतिकार केल्याने हा देश जिंकण्याची रशियाची योजना सफल होऊ शकलेली नाही. त्यामुळे रशियाने हवाई हल्ले करून युक्रेनचे जास्तीतजास्त आर्थिक नुकसान करण्याचे धोरण अवलंबिले आहे. नव्या डावपेचानुसार युक्रेनचा पाणी पुरवठा, वीज निर्मिती आणि अन्न-धान्य पुरवठा खंडित करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.
मोठय़ा प्रमाणावर जिवितहानी
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठय़ा प्रमाणावर जिवितहानी होत असून प्रत्येक आठवडय़ात किमान 50 नागरिक हल्ल्यात मृत्युमुखी पडतात, असे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर इमारती पडल्याने नागरिकांना बेघर व्हावे लागले असून हिवाळय़ात त्यांचे अनन्वित हाल होत आहेत. सुरक्षित इमारतींची संख्या अपुरी असल्याने अनेक नागरिकांना मोकळय़ा मैदानात किंवा रस्त्याकडेला तंबू ठोकून त्यात रहावे लागत आहे. उपाशी राहू पण रशियाच्या ताब्यात जाणार नाही, असा नागरिकांचाही निर्धार असल्याने युक्रेनचे सैन्य प्राणपणाने लढत आहे.
वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न
रशियन हल्ल्यात वीज निर्मिती केंद्रांची हानी होत असली तरी ती दुरुस्त करून त्वरित पुन्हा वीज पुरवठा करण्याचे सत्र युक्रेनमधील सर्वात मोठय़ा डीटीईके या वीज कंपनीने चालविले आहे. एनईसी युक्रेनरगो ही कंपनीही विशेष तज्ञांद्वारे बंद पडलेली वीज निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे युक्रेनच्या काही भागात तसेच राजधानी किव्हमध्ये गेल्या आठवडाभरात दिवसातून काही वेळ वीज पुरवठा केला जात आहे. एकंदर रशियाच्या प्रत्येक डावाला प्रति डाव या प्रकारे युक्रेनने रशियाचा जोरदार प्रतिकार चालविला आहे.
जागतिक आवाहन
युरोपियन देश आणि अमेरिकेने रशियाला युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. या युद्धामुळे कोणाचेही भले होणार नाही. रशियाला युक्रेनवर विजय मिळवता येणार नाही. तसेच रशियाचीही प्रचंड हानी होईल असा इशारा देण्यात आला आहे तरीही रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आपल्या महत्त्वाकांक्षेपासून मागे हटावयास तयार नाहीत. ही शोकांतिका असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.









