क्षेपणास्त्र हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू ः 59 जणांहून अधिक जखमी
वृत्तसंस्था / कीव्ह
रशियाने युक्रेनच्या क्रेमेनचुक शहरातील एका शॉपिंग मॉलवर क्षेपणास्त्रs डागली आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला तर 59 जणांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हल्ल्यावेळी मॉलमध्ये एक हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.
युक्रेनच्या इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या प्रमुखांनी या हल्ल्याची माहिती मंगळवारी सकाळी दिली आहे. 25 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
रशिया आणि येन यांच्यात 123 व्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. युक्रेनच्या अधिकाऱयांनी लिसीचेंस्क शहरातील लोकांना स्वतःचे घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. रशियाचे सैन्य लिसीचेंस्क शहराच्या नजीक पोहोचले आहे.

पोलंडच्या वॉर्सा शहरात युक्रेनने नष्ट केलेल्या रशियन रणगाडे आणि चिलखती वाहनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या रणगाडय़ांना आणि सैन्यवाहनांना पोलंडसह अन्य युरोपीय देशांमध्ये प्रदर्शनार्थ नेले जाणार आहे.
हल्ल्यांमुळे पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचा प्रभाव रशियावर दिसू लागला आहे. रशियाला 1918 नंतर पहिल्यांदाच विदेशी कर्जाचा हप्ता फेडता आलेला नाही. जागतिक बाजारात डॉलरद्वारे देवाणघेवाणीवर बंदी घालण्यात आल्यानंतर रशियाने स्वतःचे चलन रुबलमध्ये कर्जाचा हप्ता फेडण्याचा प्रस्ताव दिला होता, जो अमेरिकेच्या प्रभावाखाली अन्य देशांनी फेटाळला.
27 मे रोजी रशियाला विदेशी कर्जाच्या व्याजाच्या स्वरुपात 10 कोटी डॉलर्स जमा करायचे होते, याकरता रशियाला एक महिन्याची वाढीव मुदत मिळाली होती. तरीही रशियाला ही रक्कम जमा करता आलेली नाही.









