वृत्तसंस्था / दुबई
डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या 17 वर्षीय मिरा अॅन्ड्रीव्हाने इलिना रायबाकिनाचा उपांत्य फेरीत पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी अॅन्ड्रीव्हा ही सर्वात कमी वयाची टेनिसपटू आहे. आता अॅन्ड्रीव्हा आणि क्लेरा टॉसन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात अॅन्ड्रीव्हाने रायबाकिनाचा 6-4, 4-6, 6-3 अशा सेटस्मध्ये पराभव केला. या सामन्यात शेवटच्या आणि सितऱ्या सेटमध्ये अॅन्ड्रीव्हाने शेवटचे सलग पाच गेम्स जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. मात्र या उपांत्य लढतीत अॅन्ड्रीव्हाला दुसरा सेट्स गमवावा लागला होता. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात रुमानियात झालेल्या स्पर्धेत अॅन्ड्रीव्हाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
दुसऱ्या उपांत्य लढतीत डेन्मार्कच्या 38 व्या मानांकित क्लेरा टॉसनने कॅरोलिना मुचोव्हाचा 6-4, 6-7 (4-7), 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत टॉसनने टॉप सिडेड साबालेंकाचाही पराभव केला होता. चालु वर्षीच्या टेनिस हंगामात टॉसनने डब्ल्युटीए टूरवरील एक स्पर्धा जिंकली आहे.









