सर्वोच्च न्यायालयात पोहोचले प्रकरण : लुकआउट नोटीस जारी करण्यासह पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्नाटकमधील गोकर्ण येथे जंगलातील गुहेत वास्तव्य करणाऱ्या रशियन महिलेचे प्रकरण चर्चेत असतानाच दिल्लीतून आणखीन एक रशियन महिला अचानक गायब होण्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणात, मूळची रशियन महिला आणि तिचा साडेचार वर्षांचा मुलगा 7 जुलैपासून बेपत्ता आहेत. यासंबंधी भारतीय नागरिक असलेल्या रशियन महिलेच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत सदर महिलेचे रशियन दुतावासातील एका राजदूताशी प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मुलाच्या ताब्याशी संबंधित एका अनोख्या प्रकरणात रशियन महिला व्हिक्टोरिया बसू हिच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्याचे आदेश दिले आहेत. ही महिला 7 जुलैपासून तिच्या मुलासह बेपत्ता आहे. न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली पोलिसांना आई आणि मुलाला शोधून मुलाला वडील सैकत बसू यांच्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर यासंबंधी सुनावणी झाली. याप्रसंगी महिलेला देश सोडता येणार नाही असे सुचित करतानाच गृह विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.
दुतावासात मागच्या दाराने प्रवेश अन् राजदूताशी प्रेमसंबंध…
पती सैकत बसू याने आपल्या पत्नीचे रशियन राजदुताशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे. व्हिक्टोरिया हिला शेवटचे 4 जुलै रोजी मागच्या दाराने रशियन दुतावासात प्रवेश करताना पाहिले होते, असे पतीने सुनावणीदरम्यान न्यायालयात सांगितले. याप्रकरणी न्यायालयाने दुतावासाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. जर कोणताही राजदूत यात सामील आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायालयाने महिलेच्या वकिलाला तिच्या माहितीबद्दल अस्पष्ट उत्तरे दिल्याबद्दल फटकारल्यामुळे तिच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली. आदेशाचे पालन करण्यासाठी वरिष्ठ कायदेशीर आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्याचे निर्देश देण्यात आले.
लुकआउट नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने 17 जुलै रोजी केंद्र सरकारला रशियन महिलेसाठी लुकआउट नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना महिलेचा पासपोर्ट जप्त करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदरे आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांना महिला आणि मूल देशाबाहेर जाऊ नये याची खात्री करण्याचे निर्देश दिले. गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही संबंधित आदेश भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर बंदरांना पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महिलेचे 2019 पासून भारतात वास्तव्य
मुलाची आई रशियन नागरिक असली तरी 2019 पासून एक्स-1 व्हिसावर भारतात राहत आहे. चालू कार्यवाही दरम्यान न्यायालयाने तिच्या व्हिसाची मुदत वेळोवेळी वाढवली आहे. 22 मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना पालकांच्या घरांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता पोलीस महिलेवर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरले. आता ही महिला गूढपणे गायब झाल्यामुळे गृह आणि परराष्ट्र विभागाची धावाधाव सुरू झाली आहे.
चीनमध्ये भेट…, भारतात विवाह!
हे प्रकरण भारतीय वंशाचे अभियंता सैकत बसू आणि रशियन नागरिक व्हिक्टोरिया बसू यांच्याशी संबंधित आहे. दोघांचीही पहिली भेट चीनमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत झाली. तिथून सुरू झालेले हे नातेबंध भारतापर्यंत पोहोचल्यानंतर 2017 मध्ये लग्नात रुपांतरित झाले. 2020 मध्ये दोघांनाही एक मुलगा झाला. परंतु काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊन प्रकरण दिल्लीतील साकेत येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटापर्यंत पोहोचले.









