अधिकाऱ्यांनी गमाविले नियंत्रण : नाटो नौकेची मदत नाकारली
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाची हेरनौका किलडिनला मागील महिन्यात आग लागली होती. ही दुर्घटना सीरियाच्या किनाऱ्यानजीक घडली होती. आग लागल्यावर नौकेवर असलेल्या अधिकाऱ्यांनी त्याचे नियंत्रण गमाविले होते. रशियन नौकेवर असलेल्या एका अधिकाऱ्याने रेडिओद्वारे इतर जहाजांना दूर राहण्याचा इशारा दिला होता.
आमची नौका संकटात असून कृपया अंतर राखा असे रेडिओ संदेशात म्हटले गेले. तर याचबरोबर एका जहाजाला इशारा देत आमची नौका तुमच्या दिशेत असून यावर आमचे नियंत्रण नसल्याचे सांगितले होते. रशियाच्या नौकेतून धूराचे लोट अन् ज्वाळा दिसून येत होत्या.
रशियाच्या या हेरनौकेचे काम भूमध्य समुद्रात नाटोच्या हालचालींवर ठेवणे होते. आग लागण्यापूर्वी ही हेरनौका तुर्कियेच्या नौदल सरावावर नजर ठेवून होती. ही नौका किमा 4 तासांपर्यंत जळत होती. नाटो अधिकाऱ्यांनी आग लागल्यावर रशियन नौकेला मदत करण्याची ऑफर दिली होती, जी रशियन अधिकाऱ्यांनी फेटाळली होती. नौकेच्या चालक दलाने लाइफबोट्सच्या कव्हर हटविल्या होत्या, परंतु त्या पाण्यात उतरविल्या नव्हत्या. नंतर चालक दलाने नौकेवर नियंत्रण मिळविले. आता या नौकेसोबत एक फ्रिगेट आणि एक पुरवठा जहाज तैनात असून आग लागण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.
रशियन अधिकाऱ्यांनी आगीच्या घटनेची माहिती जाहीर केलेली नाही. किलडिनवर आग लागल्याची कुठलीच माहिती नाही असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी म्हटले आहे. केवळ एका नौकेच्या बिघाडाच्या आधारावर पूर्ण नौदलाच्या क्षमतेचे आकलन करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
किलडिनवर पुन्हा नियंत्रण मिळविण्यात आले असले तरीही या घटनेतून रशियन नौदलाच्या कमतरता उघड झाल्या आहेत. खासकरून भूमध्य समुद्रात रशियासाठी ताफ्याची देखभाल अत्यंत जटिलठरली आहे कारण हा भाग त्याच्या आर्क्टिक आणि बाल्टिक तळांपासून अत्यंत दूर असल्याचे फ्रान्सच्या उच्च सैन्य अध्ययन केंद्राचे माजी प्रमुख वाइस अॅडमिरल मिशेल ओल्हागराय यांनी म्हटले आहे.









