रशियन अधिकाऱ्यांचे प्रतिपादन, सहकार्यवृद्धी होणार
वृत्तसंस्था / मॉस्को
अमेरिकेने भारतावर अन्यायकारक व्यापार शुल्क लावल्यास भारतासाठी रशियाची बाजारपेठ उपलब्ध असेल, असे महत्वपूर्ण आणि आश्वासक प्रतिपादन रशियाचे भारतासाठीचे व्यापार उपप्रतिनिधी इव्हगेनी ग्रीव्हा यांनी पेले आहे. रशियाकडून इंधन तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने भारतावर 25 टक्क्यांचा अतिरिक्त कर लागू केला आहे. त्यानंतर दोन आठवड्यांनी रशियाने ही प्रतिक्रिया व्यक्त केल्याने भारताची बाजू बळकट झाली. अमेरिका जितका जास्त दबाव भारतावर आणेल, तितके भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य वाढीला लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत भारताला तेलपुरवठा सुरळीत होत रहावा, अशी ‘व्यवस्था’ रशियाने केली आहे. रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले, तरीही भारताला होत असलेल्या तेलपुरवठ्यात खंड पडणार नाही, हे रशियाने सुनिश्चित केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जवळपास 40 टक्के पुरवठा
भारताची कच्च्या इंधन तेलाची वार्षिक आवश्यकता जितकी आहे, त्याच्या जवळपास 40 टक्के तेल भारत रशियाकडून आयात करीत आहे. भारताची तेलाची प्रतिदिन आवश्यकता 50 लाख बॅरल्सची आहे. भारत रशियाकडून सध्या प्रतिदिन 20 लाख बॅरल तेल खरेदी करीत आहे. भविष्यकाळात या प्रमाणात वाढही होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत भारताचा तेल पुरवठा सुरक्षित राहील, याची शाश्वती आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
रशियाच्या निर्यातीत वाढ
गेल्या काही काळापासून भारताने रशियाला होणाऱ्या आपल्या निर्यातीत वाढ केली आहे. रशिया भारतातून मशिन टूल्स, औषधे, अनेक रासायनिक पदार्थ इत्यादींची आयात करीत आहे. यामुळे दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांमध्ये वृद्धी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंध आता अत्यंत वेगाने वाढत असून ही सकारात्मक बाब आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आता बळकट आहेत, अशीही मांडणी त्यांनी केली.
पाश्चिमात्य दुहेरी मापदंड
रशिया आणि भारतावर आणखी दंडात्मक कर लागू करण्याची योजना युरोपियन देशांनी सज्ज केली आहे. मात्र, ती विफल ठरणार आहे. असा दंडात्मक कर लागू करणे अन्यायकारक असून हा युरोपियन देशांचा दुहेरी मापदंड आहे. मॉस्को ब्रिक्स देशांवर कधीही निर्बंध घालणार नाही. रशियाचे तेल भारताला स्पर्धात्मक किमतीत मिळत असून ते यापुढेही मिळतच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
रोमन बाबुस्कीन यांचाही दुजोरा
ग्रीव्हा यांच्या वक्तव्याला भारतातील रशियाच्या दूतावासातील उपमुख्याधिकारी रोमन बाबुस्कीन यांनीही दुजोरा दिला आहे. ट्रम्प यांनी अतिरिक्त कर स्थगित केले आहेत. त्यामुळे भारतावर अतिरिक्त कर लागू असले तरी त्यांचा दबाव अन्यत्र ‘अॅडजेस्ट’ झाला आहे. तसेच युरोपियन निर्बंधांचा परिणाम अत्यल्प असून रचनात्मक समतोलामुळे या निर्बंधांचा विपरित परिणाम झालेला नाही. त्यामुळे भारताला चिंतेचे कारण नाही, असेही प्रतिपादन बाबुस्कीन यांनी केले.
सातपट वाढ
गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारात सात पट वाढ झाली आहे. आम्ही आमची व्यापार व्यवस्था बाह्या दबावापासून स्वतंत्र केली आहे. रशियाचा भारतावर पूर्ण विश्वास असून भारतानेही रशियावर पूर्ण विसंबून राहण्यास कोणतीही अडचण नाही. भारत रशियाकडून होणारी तेलखरेदी थांबविणार नाही, असा आमचा विश्वास आहे. भारत आणि रशिया हे दोन्ही देश एकमेकांशी मिळते जुळते घेत आहेत, ही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली आहे.









